इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा
लीडस / वृत्तसंस्था
डिफेंडर दिएगो लोरेन्टेने 87 व्या मिनिटाला हेडरवर केलेल्या गोलमुळे लीडसने इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत लिव्हरपूलविरुद्ध 1-1 अशी गोलबरोबरी प्राप्त केली. यजमान लीडस संघाने सामन्याच्या प्रारंभी ब्रेकवे सुपरलीगला विरोध करत आपला निषेध नोंदवला.
लीडसचे खेळाडू अर्न ईट असा संदेश असलेल्या वॉर्मअप शर्टसह मैदानात आले. प्रस्तावित 20 क्लबच्या सुपरलीग स्पर्धेला त्यांचा विरोध आहे. तो त्यांनी यावेळी व्यक्त केला. अगदी सामना सुरु असताना एका विमानाने मैदानावरुन जात से नो टू सुपरलीग असा संदेश दिला. लिव्हरपूलच्या संघ प्रशिक्षकांना मैदानात येत असताना चाहत्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.
उभय संघातील बरोबरीनंतर लिव्हरपूलच्या खात्यावर 32 सामन्यात 53 गुण असून गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी आहेत. चेल्सीचा संघ एक सामना बाकी असताना पाचव्या स्थानी आहे तर चौथ्या स्थानी वेस्ट हॅम युनायटेडचा संघ विराजमान आहे. लीडसचा संघ 46 गुणांसह 10 व्या स्थानी आहे.
लीडसचे मॅनेजर मार्सेलो बिएस्ला यांनी पराभवाची नामुष्की टाळल्याबद्दल आपल्या संघाचे अभिनंदन केले. ‘टप्प्याटप्प्यात रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी वर्चस्व गाजवले असल्याचे जाणवले. वास्तविक, दुसऱया सत्रात आमचा संघ बिकट स्थितीत होता. पराभव समोर दिसत होता. पण, निर्णायक क्षणी सुदैवाची साथ आम्हाला लाभत गेली. त्यामुळे, हा सामना बरोबरीत ठेवता आला’, असे ते म्हणाले.
लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लॉप यांनी मात्र विजय हुकल्याची खंत व्यक्त केली. ‘लीडसचा संघ बरोबरीसाठी दावेदार नव्हता, असे आम्ही अजिबात म्हणणार नाही. पण, आमच्यासाठी हा निकाल निराशाजनक आहे. पहिल्या सत्रात आमच्या संघासाठी अनेकदा संधी चालून आली. पण, त्याचा आम्हाला लाभ घेता आला नाही’, याचा त्यांनी उल्लेख केला.
दुसऱया सत्रात रॉबर्टो फर्मिन्हो आघाडी भक्कम करण्याच्या प्रयत्नात होता. पण, तो यात अपयशी ठरला आणि अंतिम, निर्णायक टप्प्यात लोरेन्टेने आपल्या मार्कर्सना चकवत जॅक हॅरिसनच्या कॉर्नरवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेण्यात यशस्वी ठरला. तत्पूर्वी, पहिल्या सत्रात सॅदिओने लिव्हरपूलतर्फे 31 व्या मिनिटाला पहिला गोल केला होता. 15 मीटर्स अंतरावरुन त्याने रिकाम्या गोलजाळीचा अचूक वेध घेतला. लीडचा गोलरक्षक मेस्लिअर यावेळी दिओगो जोताचा पास चकवण्याच्या प्रयत्नात बाजूला होता. त्याचा सॅदिओने बिनचूक लाभ घेतला होता.









