वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात लिसेस्टर फुटबॉल क्लबने बलाढय़ मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का देत त्यांची अपराजित घोडदौड रोखली. या सामन्यात लिसेस्टरने मँचेस्टर युनायटेडचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. दुसऱया एका सामन्यात लिव्हरपूलने वॅटफोर्डवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला.
लिसेस्टर आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील सामन्यात सुरूवातीला मँचेस्टर युनायटेडने दोन गोलांची आघाडी लिसेस्टरवर मिळविली होती. दरम्यान, उत्तरार्धातील खेळाच्या 5 मिनिटांच्या कालावधीत मँचेस्टर युनायटेडची बचावफळी पूर्ण कोलमडली आणि लिसेस्टरने या कालावधीत 2 गोल नोंदवून मँचेस्टरशी बरोबरी साधली. लिसेस्टरने आक्रमक चाली करत आणखी 2 गोल नोदवून मँचेस्टर युनायटेडचे आव्हान संपुष्टात आणले.
या स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने यापूर्वी झालेल्या 29 सामन्यांत एकही पराभव स्वीकारला नव्हता. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोग्बा यांची कामगिरी दर्जेदार होऊ शकली नाही.
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात लिव्हरपूलने वॅटफोर्डचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात लिव्हरपूलतर्फे रॉबर्टो फिर्मेनो यांनी शानदार हॅट्ट्रीक नोंदविली. लिव्हरपूल संघातील मानेने एक गोल नोंदविला. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सॅडिओ मानेचा हा 100 वा गोल ठरला.









