वृत्तसंस्था/न्यू कॅसल
प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्मयपद यापूर्वीच लिव्हरपूल संघाने मिळविले आहे. दरम्यान, विजेत्या लिव्हरपूल संघाने रविवारी झालेल्या सामन्यात न्यू कॅसलचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. लिव्हरपूलने प्रिमियर लिग फुटबॉल हंगामाचा शेवट विजयाने केला. त्याचप्रमाणे या संघाने मँचेस्टर सिटीच्या सर्वाधिक विजयाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
लिव्हरपूल आणि न्यू कॅसल यांच्यातील रविवारच्या सामन्यात विजेत्या लिव्हरपूल संघाकडून व्हर्जिल व्हॅन डिजेक, डिव्हॉक ओर्गी आणि सॅडिओ मॅने यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेच्या हंगामात लिव्हरपूल संघाने 38 पैकी 32 सामने जिंकून मँचेस्टर सिटीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या मोसमात लिव्हरपूलने 99 गुण नोंदवले असून ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय लिव्हरपूलने सिटीपेक्षा 18 गुण जास्त मिळविले असून 2017-18 मधील सर्वाधिक फरकाचा सिटीचा विक्रम त्यांना मोडता आला नाही. सिटीपेक्षा ते फक्त एका गुणाने कमी पडले. रविवारच्या सामन्यात पहिल्याच मिनिटाला ड्वेट गेलने न्यू कॅसलचे खाते उघडले होते.









