हजारो ठार झाल्याची भीती, कित्येक जखमी, स्थावर मालमत्तेची प्रचंड हानी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आफ्रिकेतील लिबिया या देशात डॅनियल नामक चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. या वादळात हजारो जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच किमान एक लाख लोक जखमी झाले आहेत. या देशाच्या पूर्व भागात या वादळाने अधिकतर हानी केली असून हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार 2 हजारांहून अधिक लोक मृत झाले आहेत. मात्र, ही संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. समुद्रतटावर असणारी शेकडो घरे वादळामुळे बुडाली असून त्यामुळे मृतांची संख्या नेमकी किती याचे कोणतेही अनुमान सध्या व्यक्त करणे कठीण आहे, असे पूर्व भागाचे सरकारी प्रशासक ओसामा हमद यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
युरोपातही हानी
या वादळाचा फटका युरोप खंडालाही काही प्रमाणात बसला. भूमध्य समुद्रात निर्माण झालेले हे वादळ लिबियाच्या दिशेने वेगाने सरकले. मात्र, त्याचा काही प्रमाणात परिणाम भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरोपियन देशांना बसला. तेथे या वादळामुळे 12 जण प्राणास मुकल्याची माहिती देण्यात आली आहे.
मालमत्तेची प्रचंड हानी
वादळानंतरच्या स्थितीचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या वादळाचा तडाखा किती मोठ्या प्रमाणात बसला आहे, याचे प्रत्यंतर येत आहे. असंख्य घरे नष्ट झाली आहेत. वादळप्रभावित भागांमध्ये वीजपुरवठा बंद झाला असून पक्क्या इमारतीही धाराशायी झाल्या आहेत. समुद्रतटावरची अनेक शहरे उध्वस्त झाली असून डेर्ना हे महत्त्वाचे आणि दाट लोकसंख्येचे शहर उर्वरित देशापासून तुटले आहे. संपर्क साधनेही बंद पडली आहेत. त्यामुळे साहाय्यता कार्यात अडथळे येत असून परिणामी हानी वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्रचंड पाऊस, पूर
वादळामुळे अद्यापही अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जलवृष्टी होत असून अनेक शहरांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी कित्येक रुग्णालयांमध्येही शिरल्याने ती रिकामी करावी लागली. परिणामी, वादळग्रस्तांवर वैद्यकीय उपचार करणेही बराच काळ अशक्य बनले होते. पूर्व भागातील बायदा शहरातील जवळपास सर्व रुग्णालये बंद करावी लागली आहेत.
कमी दाबाचा पट्टा
वादळामुळे पूर्व आणि उत्तर लिबियावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. युरोपातील काही वेधशाळांनी या वादळाचा इशारा मागच्या आठवड्यांमध्येच दिला होता. तथापि, लिबियाच्या प्रशासनाने पुरेशी तयारी केली नाही, असा आरोपही आता होत आहे.
साहाय्याचा ओघ सुरु
सोमवारी झालेल्या या वादळाची सविस्तर माहिती मंगळवारी देण्यात आली. त्यानंतर इतर देशांमधून साहाय्य सामग्रीचा ओघ सुरु झाला आहे. तथापि, अद्यापही पावसाचा जोर न ओसरल्याने साहाय्यता कार्यात अडथळे येत आहेत. स्थानिक प्रशासनांकडून वादळग्रस्तांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का
तीन दिवसांपूर्वीच आफ्रिकेतील मोरोक्को या देशाला बसलेल्या भूकंपाच्या तडाख्यात जवळपास 3 हजार लोकांचा बळी गेला होता. त्यापाठोपाठ याच खंडातील लिबिया हा देश आता वादळाच्या तडाख्यात सापडला आहे. अशा प्रकारे या खंडाच्या दोन देशांना एका आठवड्याच्या आत भीषण नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. मोरोक्कोतील भूकंप त्या देशातील सर्वात मोठा मानला जातो.
देश अस्ताव्यस्त
ड भीषण वादळामुळे लिबिया देश अस्ताव्यस्त, भयंकर जीवितहानी
ड देशाच्या पूर्व आणि उत्तर भागांमध्ये अनेक शहरे अक्षरश: उद्ध्वस्त
ड सततच्या पावसाने साहाय्यता कार्यात अडथळे, हानी वाढणे शक्य
ड अनेक मानवी वस्त्यांमध्ये महापूर, पाणी शिरल्याने रोगराईचा धोका









