ऑनलाईन टीम / त्रिपोली :
लिबियातील अशवरीफ येथून अपहरण झालेल्या सात भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ट्युनेशियातील भारतीय राजदूत पुनीत रॉय कुंदल यांनी याची माहिती दिली.
कुंदल म्हणाले, 14 सप्टेंबर रोजी अपहरण झालेले सात जण मायदेशी परतण्यासाठी त्रिपोली विमानतळाकडे जात होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर भारताने लीबिया सरकार आणि तेथे असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांशी संपर्क साधून भारतीय नागरिकांना मुक्त करण्यासाठी मदत मागण्यात आली होती.
या सात जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हे सात जण एका कन्स्ट्रक्शन आणि ऑईल कंपनीत काम करत होते. ते मूळचे आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. ट्युनिशियातील भारतीय दुतावास या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते.
दरम्यान, लिबियातील वातावरण परदेशी नागरिकांसाठी चांगले नसल्याने भारत सरकारने 2016 मध्ये लिबियात जाण्यासाठी पूर्णपणे निर्बंध घातले होते. ते निर्बंध आजही कायम आहेत.









