भुवन पुजारी, अमृता काजरेकर, वैभवी बुद्रुक यांना वैयक्तिक विजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खाते व रविंद्रनाथ टागोर पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित तालुकास्तरीय पदवीपूर्व आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत 92 गुणांसह लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर मुलांमध्ये भुवन पुजारी, भरतेश पीयू कॉलेज व मुलींमध्ये अमृता काजरेकर व वैभवी बुद्रुक, आरपीडी महाविद्यालय यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित पदवीपूर्व महाविद्यालयीन तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शेवटच्या दिवशी सांगता समारंभ झाला. या स्पर्धेत 92 गुणांसह लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद तर मुलांमध्ये भुवन पुजारी भरतेश, अमृता काजरे व वैभवी बुद्रुक यांनी 15 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात लिंगराज महाविद्यालयाने विजेतेपद तर सिद्धरामेश्वर महाविद्यालयाने उपविजेतेपद, मुलींच्या विभागात सिद्धरामेश्वर संघाने विजेतेपद तर आरपीडी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. कब्बड्डी स्पर्धेत मुलांच्या विभागात कल्पवृक्ष पदवीपूर्व महाविद्यालयाने विजेतेपद, ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाने उपविजेतेपद, मुलींच्या गटात ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाने विजेतेपद, बहिर्जी शिरोळकर महाविद्यालय हंदिगनूर संघाने उपविजेतेपद, खो खो स्पर्धेत मुला-मुलींमध्ये ज्योती महाविद्यालयाने विजेतेपद तर मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले.
थ्रोबॉल स्पर्धेत मुलांच्या विभागात गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालयाने विजेतेपद तर आरपीडी महाविद्यालयाने उपविजेतेपद, मुलींमध्ये मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाने विजेतेपद तर आरपीडी महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. बक्षीस वितरण रविंद्रनाथ टागोर महाविद्यालयाचे अध्यक्ष सी. एन. नायकर, श्वेता नायकर, जी. एन. पाटील, प्रभू शिवनायकर यांच्या हस्ते लिंगराज महाविद्यालयाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी एम. रामराव, एच. एस. सिंगाडे, बसवराज होसमठ, शंकर कोलकार आदी उपस्थित होते.









