स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सादरीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा मोबाईल्सकडून लावा झेड 61 प्रो स्मार्टफोनसोबत फिचर फोन लावा ए 5 आणि लावा ए 9 प्राउडली इंडियन या विशेष आवृत्तीचे सादरीकरण केले असून ते लवकरच फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले आहे.
देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उत्सव साजरा करण्यासाठी कंपनीने प्राउडली इंडियन लोगोसोबत लिमिटेड एडिशन फोन्सचे सादरीकरण केले आहे. यामध्ये फोनच्या मागील बाजूला राष्ट्रध्वजाचे तीन रंग दिसणार आहेत. भारतामध्ये लावा झेड 61 प्रो फोन 2 जीबी+16जीबी मॉडेलची किंमत 5,777 रुपये आहे. तसेच लावा ए 5 आणि लावा ए 9 फिचर फोनमध्ये शँपेन गोल्ड रंगात हा उपलब्ध होणार असून याची किमत क्रमशः 1,333 रुपये आणि 1,574 रुपये ठेवण्यात आली आहे.
22 भाषांची सुविधा
सदरच्या फोनमध्ये देशातील स्थानिक भाषांचा समावेश करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगु, गुजराती आणि पंजाबीसोबत सात भाषांमध्ये टाईपिंगची सुविधा मिळणार आहे. याच्यासह फोनमध्ये इंस्टंट टॉर्च, रिकॉर्डिंगसोबत वायरलेस एफएम, यूएसबी कनेक्टिव्हीटी आणि ब्लूटय़ूथची सोय मिळणार आहे.









