पुणे/प्रतिनिधी
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, सुरेखा पुणेकर या पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यताही २०१९ साली व्यक्त करण्यात आली होती. प[न सुरेख पुणेकर या अधिकृत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील माहिती सुरेखा पुणेकर यांनीच एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सुरेखा पुणेकर यांनी आपण आतापर्यंत कलेची सेवा केली आता जनतेची सेवा करायची आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीमध्ये “चित्रपट, कला, साहित्य, संस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मी कलेची सेवा केली आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे, महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. १६ सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे,” असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे.