जिल्हय़ात 28 लाख 9 हजार 109 पाळीव जनावरे : पशुसंगोपन खात्याने त्वरित मोहीम राबविण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
पशुसंगोपन खात्यामार्फत दरवषी दोन टप्प्यात राबविली जाणारी लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम यंदादेखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील 14 लाखांहून अधिक जनावरे लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. दरवषी पावसाळय़ापूर्वी आणि ऑक्टोबरदरम्यान अशी दोनवेळा लसीकरण मोहीम राबविली जाते. मात्र यंदा पहिल्या टप्प्यातील लसीकरणदेखील झाले नाही. तसेच ऑक्टोबर महिन्यातील लसीकरण मोहीमदेखील लांबणीवर पडल्याने पशुपालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हय़ात 28 लाख 9 हजार 109 पाळीव जनावरे आहेत. या सर्व जनावरांना लाळय़ा-खुरकतपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरदरम्यान या रोगाची मोठय़ा प्रमाणात लागण होत असते. त्यामुळे पशुसंगोपन खात्याने तातडीने प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे. अलीकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाळीव जनावरांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र कोरोनामुळे जनावरांना वेळेत प्रतिबंधक लसीकरण केले जात नसल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहेत.
मोहिमेला तातडीने प्रारंभ करा
बेळगाव तालुक्मयात 1 लाख 78 हजार 75 इतकी पाळीव जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस, शेळय़ा-मेंढय़ांचा समावेश आहे. या सर्व जनावरांना प्रतिबंधक लस देणे आवश्यक आहे. विविध रोगांचा नायनाट करण्यासाठी खात्यामार्फत दरवषी पशुपालकांच्या घरोघरी जाऊन मोफत लसीकरण केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे पहिल्या टप्प्यातील लसीकरणही झाले नाही. त्यामुळे दुसऱया टप्प्यातील प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला तातडीने प्रारंभ करावा, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे.
लाळय़ा-खुरकत हा संसर्गजन्य रोग असून खुरांमध्ये जखमा होतात, ताप येतो, तोंडाला व जिभेला पुरळ आल्याने जनावराला खाता येत नाही. त्यामुळे दूध कमी होऊन जनावर दगाविण्याची शक्मयता असते. त्यामुळे खात्याने खबरदारी म्हणून रोगाची लागण होण्यापूर्वी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.