राजद्रोहसारखा गुन्हा दाखल करून केली होती अटक
प्रतिनिधी /बेळगाव
हलशी (ता. खानापूर) येथे लाल-पिवळय़ा रंगाचा ध्वज जाळल्याच्या आरोपातून राजदोहाचा गुन्हा दाखल करून अटक केलेल्या तिघा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गणेश कृष्णाजी पेडणेकर, सचिन ओमाण्णा गुरव, संजू ऊर्फ संजीव ओमाण्णा गुरव अशी जामिनावर सुटका झालेल्यांची नावे आहेत.
हलशी येथे दि. 20 डिसेंबर 2021 रोजी लाल-पिवळय़ा रंगाचा ध्वज पेटवून दिला होता. त्यानंतर हलशी ग्रामपंचायतीचे पीडीओ रामाप्पा जायाप्पा राडेर यांनी नंदगड पोलीस स्थानकामध्ये या तिघांच्या विरोधात फिर्याद दिली. नंदगड पोलिसांनी भा.दं.वि. 153(ए), 295, 427, 120(ब), सेक्शन 2 केपीडीपी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या तरुणांवर राजद्रोहसारखा 124(ए) हा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
या तिघांनीही येथील आठवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन या तिघांनाही न्यायालयाने 1 लाख रुपयांचे दोन जामीनदार, तितक्मयाच रकमेचे हमीपत्र, प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहणे, पोलीस अधिकाऱयांना सहकार्य करणे, साक्षीदारांना धमकावू नये, भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करू नये, अशा अटींवर जामीन मंजूर केला आहे. या तिघांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बेंदे यांनी काम पाहिले आहे.








