पंतप्रधान मोदी यांचा सपवर हल्लाबोल, गोरखपूरमध्ये विविध योजनांचे उद्घाटन
गोरखपूर / वृत्तसंस्था
पुढच्या वर्षी होणाऱया उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी फुंकले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात त्यांनी तीन महत्वपूर्ण महायोजनांचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आदित्यनाथ सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावाही घेतला.
समाजवादी पक्ष, बसप इत्यादी पक्षांची सत्ता असताना उत्तर प्रदेशचा कोणताही विकास झाला नाही. इतर राज्यांच्या तुलनेत हे राज्य मागे राहिले. केवळ आपल्या कुटुंबाचे कल्याण हा एकच कार्यक्रम या पक्षांनी राबविला. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक महत्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प राज्यात मार्गी लागले असून त्यांपैकी अनेक पूर्णही झाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला असून अशीच घोडदौड पुढेही व्हावी यासाठी राज्याची जनता पुन्हा भाजपलाच या निवडणुकीत कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही सरकारांचा राज्याला लाभ
केंद्रात भाजपचे आणि रालोआचे सरकार आहे. उत्तर प्रदेशातही गेली पाच वर्षे भाजपचेच सरकार आहे. ही दोन्ही सरकारे एकमेकांना ‘डबल इंजिन’ प्रमाणे पूरक ठरलेली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपचेच सरकार निवडून देणे हे राज्यातील जनतेला याच कारणासाठी हिताचे ठरणार आहे. राज्यातील मतदार या महत्वाच्या मुद्दय़ाचा विचार करुन भाजपचेच समर्थन करतील. गेली पाच वर्षे वाहणारी विकासगंगा तशीच पुढे वाहू देतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सप-रालोद युतीची घोषणा
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. सपचे नेते अखिलेश यादव आणि रालोदचे नेते जयंत सिंग यांनी संयुक्त सभा घेऊन या युतीची घोषणा केली. युतीचे जागावाटप योग्यवेळी घोषित करण्यात येणार आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीतही सपची रालोदशी आणि काँगेसशी युती होती. यंदा मात्र, काँगेसशी सपची युती होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. रालोदशी युती सपला पश्चिम उत्तर प्रदेशात बळकट करेल, असा विश्वास अखिलेश यादव यांनी जाहीर सभेत व्यक्त केला. भाजपचा पराभव अटळ असल्याचे वक्तव्यही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या प्रसंगी केले.









