ऑनलाईन टीम/तरुण भारत
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्य़ात रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणात यादव यांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. झारखंडच्या दोरांडा कोषागारातून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून 24 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 1996 साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी 26 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल दिला आहे.
दरम्यान, बेकायदेशीर पैसे काढल्याप्रकरणी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. दुपारी १२ वाजता शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. चारा घोटाळ्याच्या या मोठ्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय अन्य ३७ दोषींनाही शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजल्यापासून रांची सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांच्या न्यायालयातून सर्व दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आळीपाळीने शिक्षा सुनावली जाईल. दोषींना तुरुंगातूनच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद यांच्यासह सर्व ३८ आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले. प्रकृतीच्या कारणास्तव लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या रांची रिम्समध्ये उपचार सुरू आहेत.