नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चारा घोटाळय़ात दोषी ठरल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांची किडनी 80 टक्क्मयांहून अधिक निकामी झाली आहे. लालू सध्या प्रकृतीच्या कारणास्तव आरआयएमएस रुग्णालयाच्या पेइंग वॉर्डमध्ये दाखल आहेत. दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली दिसली नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास त्यांना डायलिसिस करावे लागू शकते. सद्यस्थितीतील वैद्यकीय निरीक्षणानुसार लालूप्रसाद यादव यांचे डायलिसिस करून रक्त स्वच्छ करण्याची गरज भासू शकते, असे उपचार करणाऱया डॉ. विद्यापती यांनी सांगितले. सध्या त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील शुगरचे प्रमाण सर्वसामान्य पातळीवर आहे. त्यांच्या किडनीसह इतर आजारांवरही सातत्याने देखरेख केली जात आहे.









