रांची / वृत्तसंस्था
चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गुरुवारी रात्री अचानक बिघडली. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. सध्या त्यांच्यावर रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. लालूप्रसाद यादव यांची कोरोना चाचणीही करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शुक्रवारी दिवसभर सीटी स्कॅनसह अन्य चाचण्या करण्यात वैद्यकीय यंत्रणा गुंतली होती. लालूप्रसाद किडनी आणि हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्याचप्रमाणे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही त्यांना आहे. त्यांच्या किडण्या केवळ 25 टक्के कार्यरत असल्याची माहिती ‘रिम्स’च्या डॉक्टरांनी दिली आहे.









