मुंबई/प्रतिनिधी
मुंबईतील लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. पाचव्या मजल्याला लागलेली आग हळूहळू १९ व्या मजल्यापर्यंत पोहचली. आग लागल्यानंतर अर्ध्यातासानंतरही या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामन दलाच्या गाड्या पोहचल्या नव्हत्या. दरम्यान या दुर्घटेनेमध्ये येथील एका सुरक्षारक्षकाचा दुर्देवी अंत झाला आहे. आगीपासून वाचण्यासाठी बाल्कनीला लटकलेल्या सुरक्षारक्षकाचा खाली पडून मृत्यू झाला. हा सर्व थरार कॅमेरात कैद झालाय.
या सगळ्या घटनाक्रमादरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल हे देखील घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी ही आग नियंत्रणात आल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे.
घटनास्थळावरुन माध्यमांशी संवाद साधताना चहल म्हणाले, “इथे जी दुर्दैवी घटना घडली आहे तिला दोन भागात बघितलं पाहिजे. सर्वात आधी म्हणजे ही आग लवकरात लवकर विझवायला हवी. आम्हाला ११ वाजून ५१ मिनिटांनी माहिती मिळाली आणि लगेचच तिथे लोक पोहोचले. ही आग आता विझवली गेली आहे. आमचे अधिकारी त्या इमारतीतच आहेत. आणखी काही घटना घडू नये यासाठी ही आग कायमची विझवली गेली पाहिजे. कारण अजूनही धूर येत आहे. आग विझली नाही तर ही आग पुन्हा लागण्याची शक्यता आहे. कारण तशा काही गोष्टी इमारतीमध्ये आहेत. इथे एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल”.









