ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. त्यामुळे लालबाग राजा गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यंदा लालबाग राजा मंडळ आरोग्योत्सव साजरा करणार आहे. मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लालबाग राजा मंडळाचे कौतुक ट्विटर द्वारे केले आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आपल्या 86 वर्षांच्या परंपरेला फाटा देत यंदा हे मंडळ 11 दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा दान उपक्रम राबवणार आहे.









