मर्यादित उत्पन्न असणार्यांना मुलांचं शिक्षण, लग्नाची चिंता सतावत असते. भरपूर परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड्स, शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र सामान्य गुंतवणूकदार अजूनही सुरक्षित पर्यायांमध्येची गुंतवणूक करतात. तुम्हाला पारंपरिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा हवा असेल तर आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिटचा पर्याय निवडता येईल. रिकरिंग डिपॉझिटमधल्या गुंतवणुकीवर मुदत ठेवींपेक्षा अधिक व्याज मिळतं. तसंच यात फार मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते. आरडीमध्ये दिवसाला फक्त 200 रुपये गुंतवणूक तुम्ही 10 लाख रुपये साठवू शकता.
विविध बँकांमध्ये रिकरिंग डिपॉझिट खातं उघडता येतं. या बँकांमधले व्याजदर वेगवेगळे असतात. तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये आठ ते दहा वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर 6.35 टक्के इतकं व्याज मिळू शकतं. एक किंवा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर 6.65 टक्के व्याजदर आहे. दोन ते तीन वर्षांपेक्षा आणि तीन ते आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर अनुक्रमे 6.70 आणि 6.50 टक्के इतकं व्याज मिळतं. या बँकेत दहा वर्षांसाठी मासिक सहा हजार रुपये गुंतवल्यास दहा वर्षांनी तुम्हाला जवळपास 10,05625 रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला 2,85,625 रूपये व्याजस्वरूप मिळतील.
पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये दहा वर्षं गुंतवणूक केल्यास 5.8 टक्के व्याज मिळतं. यात महिना सहा हजार रुपये दहा वर्षांसाठी गुंतवल्यास तुम्हाला 9,75,885 रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला 2,55,885 रुपये व्याज मिळेल. पंजाब नॅशनल बँकही दहा वर्षांच्या आरडीवर 5.8 टक्के व्याज देते. भारतीय स्टेट बँक पाच ते दहा वर्षांच्या आरडीवर 5.70 टक्के इतकं व्याज देते. इथे महिना सहा हजार रुपये गुंतवल्यास जवळपास 9,70,594 रुपये मिळतील. त्यापैकी 2,50,294 रुपये व्याज म्हणून मिळतील.









