भारताविरुद्ध तिसरी कसोटी : पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी केवळ 55 षटकांचा खेळ
सिडनी / वृत्तसंस्था
युवा फलंदाज विल पुकोवस्की (62) व मार्नस लाबुशाने (नाबाद 67) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलियाने येथील तिसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 2 बाद 166 धावांची मजल मारली. सातत्याने पावसाचा व्यत्यय येत राहिल्यानंतर दिवसभरात केवळ 55 षटकांचा खेळ होऊ शकला. भारतासाठी कर्दनकाळ ठरणारा स्टीव्ह स्मिथ 64 चेंडूत 31 धावांवर नाबाद राहिला, ही धोक्याची घंटा ठरते आहे.
एरवी स्मिथला बाद करणे भारतासाठी डोकेदुखी असते. या मालिकेतील पहिल्या टप्प्यात अश्विनने स्मिथला सातत्याने चकवे देत हवेहवेसे यश प्राप्त केले. पण, येथील तिसऱया लढतीच्या पहिल्या दिवशी स्मिथने खेळपट्टीवर ठाण मांडण्यात यश प्राप्त केले. त्याने अश्विनसह सर्वच भारतीय गोलंदाजांचा सावध पवित्र्यावर भर देत सामना केला आणि दिवसअखेर नाबादही राहिला. स्मिथच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या कारकिर्दीची जडणघडण करणाऱया लाबुशानेला उत्तम सूर सापडला असून ही जोडी लवकर गुंडाळता आली तरच भारताला वर्चस्व गाजवण्याच्या दिशेने पुढे सरकता येईल.
पुकोवस्कीला दुहेरी जीवदाने
पदार्पणवीर पुकोवस्कीला 62 धावांच्या खेळीदरम्यान अनेक जीवदाने लाभली आणि याचा त्याने पुरेपूर लाभही घेतला. स्टीव्ह स्मिथ पहिल्या टप्प्यापासूनच सकारात्मक पवित्र्यात होता आणि भारतीय गोलंदाज आपल्यावर कुरघोडी करणार नाहीत, याची त्याने जणू पहिल्या चेंडूपासूनच दक्षता घेतली. मागील 3 डावात स्मिथला 1, 0 व 8 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले होते. येथे मात्र त्याने सावध व संयमी खेळीवर अधिक भर दिला.
पुकोवस्कीला बाद केल्यानंतर उत्साहाने भारलेल्या नवदीप सैनीने स्मिथला फुलस्विंग मारा करण्याची चूक केली आणि याचा स्मिथने पुरेपूर लाभ घेत उत्तम जम बसवला. एकदा स्मिथ क्रीझवर आल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याचा काटा काढण्यासाठी अलीकडील कर्दनकाळ अश्विनकडे चेंडू सोपवला. पण, यावेळी स्मिथ अधिक सावधगिरीने खेळला आणि अश्विनला काही चौकारासाठी फटकावत त्याने सर्व दडपण दूर सारले.
लाबुशानेने बुमराहला पूलचा फटका मारला आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास आणखी दृढावला. लाबुशाने व पुकोवस्की यांनी तिसऱया गडय़ासाठी 100 धावांची भागीदारी साकारली. नंतर पुकोवस्की व स्मिथ यांनी 60 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. चहापानापर्यंत 4 तासांचा खेळ वाया गेला असताना पुकोवस्की व लाबुशाने क्रीझवर होते. तत्पूर्वी, सिराजने डेव्हिड वॉर्नरला स्वस्तात बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नरने पहिल्या स्लीपवरील पुजाराकडे सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला. अश्विनने पुकोवस्कीला चकवा दिला. पण, यष्टीमागे पंतचे खराब यष्टीरक्षण भारतासाठी फटका देणारे ठरले. पंतने पहिल्या दिवसात 2 झेल सांडले आणि दोन्ही वेळा पुकोवस्कीच सुदैवी ठरला.
सातत्याने पावसाचा व्यत्यय येत असताना सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या ग्राऊंडसमननी बरेच कष्ट उपसले आणि सामना सुरळीत सुरु होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, ठरावीक अंतराने संततधार सुरुच राहिल्याने दिवसभरात केवळ 55 षटकांचा खेळ होऊ शकला.
अश्विनवर दडपण आणण्याचा प्रयत्न होता : स्टीव्ह स्मिथ

पहिल्या 2 कसोटी सामन्यात सरस ठरलेल्या अश्विनवर दडपण राखण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्यात उत्तम यशही मी प्राप्त केले, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ म्हणाला. तिसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर, स्मिथ व अश्विन यांच्यात बरीच जुगलबंदी रंगली. मात्र, या वेळी स्मिथने अश्विनचा सावधपणे सामना करत त्याला यश मिळणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.
अन् नवोदित मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया कसोटी सामन्याच्या प्रारंभी, राष्ट्रगीत गाताना युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले आणि अगदी राष्ट्रगीत पूर्ण होईतोवर तो अश्रू टिपत राहिला होता. सिराजने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करावे, हे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. नोव्हेंबरमध्येच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. या कसोटी मालिकेतील दुसऱया लढतीत मेलबर्नमध्ये सिराजने कसोटी पदार्पण केले आहे. येथील पहिल्या दिवसाच्या खेळात सिराजने 14 षटकात 46 धावात 1 बळी, असे पृथक्करण नोंदवले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : विल पुकोवस्की पायचीत गो. सैनी 62 (110 चेंडूत 4 चौकार), डेव्हिड वॉर्नर झे. पुजारा, गो. सिराज 5 (8 चेंडू), मार्नस लाबुशाने खेळत आहे 67 (149 चेंडूत 8 चौकार), स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 31 (64 चेंडूत 5 चौकार). अवांतर 1. एकूण 55 षटकात 2 बाद 166.
गडी बाद होण्याचा क्रम
1-6 (डेव्हिड वॉर्नर), 2-106 (पुकोवस्की, 34.2).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 14-3-30-0, मोहम्मद सिराज 14-3-46-1, रविचंद्रन अश्विन 17-1-56-0, नवदीप सैनी 7-0-32-1, रविंद्र जडेजा 3-2-2-0.









