वृत्तसंस्था/ सिडनी
विंडीजच्या आगामी दौऱयासाठी सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 23 जणांचा संघ जाहीर केला. दरम्यान कोरोना महामारीसाठी अंमलात आणलेल्या हवाई प्रवासाच्या निर्बंधामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज लाबुशानेला या दौऱयासाठी संघातून वगळण्यात आले आहे.
गेल्या मार्चमध्ये न्यूझीलंडचा दौरा हुकलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कमिन्स यांच्यासह सात क्रिकेटपटूंचा विंडीजच्या आगामी दौऱयासाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. स्मिथ, वॉर्नर आणि कमिन्स यांची यापूर्वी विंडीजनंतर होणाऱया दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या तीन अव्वल क्रिकेटपटूंचे मालदीव येथून चार्टर फ्लाईटने सिडनीत सोमवारी आगमन झाले. लाबुशाने सध्या वेल्समध्ये इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ग्लॅमरगन संघाकडून खेळत आहे. कोरोना महामारीमुळे हवाई प्रवासाच्या निर्बंध घालण्यात आलेल्या नियमामुळे लाबुशानेला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळू शकले नाही. विंडीजच्या दौऱयात ऑस्ट्रेलियन संघ बार्बाडोसमध्ये तीन वनडे सामने त्यानंतर सेंट लुसियामध्ये टी-20 चे पाच सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ- फिंच, ऍगर, बेरेनडॉर्फ, कॅरे, पॅट कमिन्स, हॅझलवूड, हेन्रीक्स, मिचेल मार्श, मॅक्सवेल, मेरेडिथ, फिलीप, जे. रिचर्डसन, के. रिचर्डसन, तन्वीर संघ, शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, स्टोईनिस, स्वॅप्सन, टाय, वेड, वॉर्नर, झंपा.









