पतिनिधी / लातूर
लातूर पालकमंत्री अमीत देशमुख यांनी लातूरकरांना दिलेले पिण्याच्या पाण्याचे आश्वासन लातूरकरांसाठी चर्चेचा विषय ठरला असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून लिंबोटी धरण ते उजनीचे धरण अशा व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. यातील काही भाषणे लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील म्हणजे गेल्या पाच वर्षापुर्वी झालेल्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील आहेत तर काही आश्वासनेही 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील आहेत. या दोन्ही भाषणांमध्ये पालकमंत्री अतिशय ठामपणे लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवू असे अभिवचन देतात. परंतू पाण्याचा प्रश्न मात्र जैसे थे राहिल्याने पालकमंत्र्यांच्या आश्वासनाचा विषय सर्वत्र चर्चिला जात आहे.
येणार्या काही दिवसात लातूर शहर महापालिकेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जावू शकतो. या विरोधकांच्या आरोपाला पालकमंत्री कसे सफाईदारपणे उत्तर देतील याकडे लातूरकरांचे लक्ष लागलेले आहे. लातूरच्या पाण्याचा प्रश्न हा देशपातळीवरच नव्हे तर तो जागतिक पातळीवर यापुर्वीच गेलेला आहे. लातूरच्या पाण्याची चर्चा सर्वत्र होत असताना या प्रश्नावर अद्याप ठोस भुमिका होवू शकली नाही. आजही लातूरकरांना 10 दिवसाआड पाणी येते. परंतू राजकीय नेतृत्वाने तो प्रश्न कायमचा सोडविला नाही.
नव्हे त्यांची इच्छाही दिसत नाही. लातूरकरांना कधी उजनीचे तर कधी नांदेड जिल्ह्यातील लिंबोटीच्या पाण्याचे आश्वासन सत्ताधार्यांकडून दिली जात असली तरी ती पुर्णत्वास कधी जातील हे लातूरकरांना पडलेले कोडे आहे. परंतू पालकमंत्र्यांच्या या आश्वासनाची क्लिप मात्र सध्या जोरात फिरतांना दिसत आहे.









