प्रतिनिधी / लातूर
लातूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून भाजपचे राहुल गोविंदराव केंद्रे तर उपाध्यक्ष म्हणून भाजपच्या भारतबाई सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काम पाहिले. काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार सोनाली थोरमोटे व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार धनंजय देशमुख यांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांचा कार्यकाळ संपल्याने आज या दोन्ही पदासाठी निवडणूक झाली. 58 सदस्य असलेल्या लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. तरीही राज्यामध्ये झालेल्या सत्तांतरामुळे या जिल्हा परिषदेमध्ये फाटाफूट होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, लातूर जिह्यातील भाजप अभेद्य राहिली. या निवडीमध्ये दोन्ही पदावर भाजपचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले. लातूर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 58 सदस्य आहेत. त्यापैकी धिरज देशमुख हे आमदार म्हणून निवडून गेल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. एकूण 57 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे एकूण 35 सदस्य आहेत. भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे परंतु गेल्या महिन्यात लातूर महापालिकेत भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांनी काँग्रेसला साथ दिल्याने महापालिकेत सत्तांतर झाले. त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत होईल का तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने व कॅबिनेट मंत्री म्हणून अमित देशमुख यांची निवड झाल्याने या निवडणुकीत ते काहीतरी किमया करु शकतील अशीही शंका उपस्थित केली जात होती.
सभागृहामध्ये भाजपचे सदस्य निवडून यावेत यासाठी कालपासून पेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे ठाण मांडून होते. आज सकाळी शहरातील एका हॉटेलमधून भाजपचे सर्व सदस्य एका ट्रव्हल्समधून जिल्हा परिषदेत दाखल झाले. प्रत्यक्ष दुपारी 2 वाजता पदाधिकारी निवडीस प्रारंभ झाला. या दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घ्यावयाच्या वेळेत काँग्रेसच्या सोनाली थोरमोटे व धनंजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कालपर्यंत विद्यमान उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके हे अध्यक्षपदाचे उमेदवार राहतील असा प्रयत्न चालू होता; पण विरोधकांकडून झालेल्या दबावानंतर भाजपने अध्यक्षपदासाठी राहुल पेंद्रे व उपाध्यक्ष पदासाठी भारतबाई सोळंके यांची नावे पुढे केली व भाजपचे हे दोन्ही पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. राहुल गोविंदराव केंद्रे हे उदगीर तालुक्यातील लोहारा जि.प. मतदार गटातून निवडून आलेले सदस्य आहेत. तसेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे यांचे चिरंजीव आहेत. भारतबाई दगडू सोळंके या निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. या मतदार गटातून निवडून आलेल्या सदस्या आहेत. लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या या प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेमध्ये मोठय़ा संख्येने वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
यावेळी नूतन उपाध्यक्षा भारतबाई सोळंके यांनी माजी मंत्री आम.संभाजी पाटील निलंगेकर यांचे या पदावर बसण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी निवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी आ.अभिमन्यू पवार, रमेशप्पा कराड, अरविंद पाटील निलंगेकर, माजी आ.विनायकराव पाटील, गणेशदादा हाके, माजी आ.पाशा पटेल यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. निवडीनंतर भाजपा समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
सर्वसामान्य जनेतेला न्याय मिळवून देणार
माझ्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल याची यतकिंचीतही कल्पना नव्हती. पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी व वंचितांना न्याय देण्याचे काम यापुढे आपण करू. या सभागृहात पुर्वी माझे वडील हे विरोधी पक्षनेते होते. आता या ठिकाणी मी जि.प.च्या माध्यमातून अध्यक्ष झालो आहे.
नूतन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे









