मांजरा व तेरणा प्रकल्पातून पाणी सोडल्याने जिल्ह्यातील अनेक गावामध्ये पुरग्रस्त स्थिती
प्रतिनिधी / लातूर
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच मांजरा धरणातील आठरा दरवाज्यापैकी बारा दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होवून नदीकाठच्या गावात पाणी शिरले आहे. मांजरा नदीकाठच्या महापूर व भातखेड्याच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून पुरात अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 906.9 मिली मिटर पाऊस झाल आहे. गेल्या 24 तासात 66.9 मिलीमिटर पावसाची नोंद झालेली आहे. मांजरा, तेरणा नदीकाठच्या गावकर्यांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असून पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता असल्याने नागरीकांनी सतर्क राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात अनेक महसुल मंडळात अतीवृष्टी झाली आहे. मांजरा व तेरणाच्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या जमिनी पुर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात येतील. जिल्ह्यातील शेतकर्यांनी घाई करू नये. घराबाहेर पडू नये. शेतशिवारात जावू नये. शेतामधील पशुधन सुरक्षीत स्थळी हालवावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यावरील नदी व ओढे यावर पुल आहेत. या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुक काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू असल्याने कोणत्याही क्षणी पाणी पातळी वाढू शकते. हा धोका लक्षात घेवून या मार्गावरील एस.टी.बसेस, खाजगी प्रवासी वाहतुक करणार्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आता पर्यंत 906.9 मि. मी एवढा पाऊस
जिल्ह्यात दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 66.9 मिमी पावसाची नोंद झाली असून आज पर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 109 टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हयात दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी झालेले तालुका निहाय पर्जन्यमान तसेच 1 जून ते 28 सप्टेंबर 2021 पर्यंत झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. (आकडेवारी मि.मी.मध्ये ) लातूर-82.7 (920.8) , औसा-64.4, (852.4) , रेणापूर 63.3, (985.5) ,अहमदपूर – 82.7 (1057.3) , चाकूर- 72. 0, (911.8), उदगीर-69.7 (972.9), जळकोट- 75.7 (1041.4),निलंगा-48.8 (779.2), देवणी- 45.0. (820.3) व शिरुर अनंतपाळ- 57.9 (820.3) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत झालेला पाऊस 906.9 मि.मी. इतका असून वार्षिक सरासरीच्या 109.5 टक्के आहे.









