सभापती राजेश पाटणेकर यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / पणजी
लाटंबार्से ज्ल्हा पंचायत मतदारसंघातील पराभव जिव्हारी लागलेल्या सभापती राजेश पाटणेकर यांना त्यांच्या डिचोलीतील कार्यकर्त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. पाटणेकर यातून भावनिक झाले. आमदार या नात्याने आपणच या पराभवाची जबाबदारी स्वीकारीत आहे, असे ते म्हणाले.
दैनिक ‘तरुण भारत’शी संपर्क साधून सभापती राजेश पाटणेकर म्हणाले की, डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ हे लाटंबार्सेमधील पराभवास जबाबदार नाहीत, कारण सावळ यांनी भाजपला पाठिंबा दिलेला असेलही परंतु ते आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. तेव्हा त्यांना याकामी जबाबदार धरणे अत्यंत चुकीचे ठरणार. त्यांनी जाहीरपणे भाजपला पाठिंबा दिलेला नव्हता. लाटंबार्सेमधील पराभवाची मिमांसा लवकरच आमच्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली जाईल.
माझा निर्णय राज्य पक्ष श्रेष्ठींबरोबरील चर्चेनंतर
राजेश पाटणेकर यांनी वरील निवेदनाबरोबरच आणखी एक महत्त्वाचे निवेदन केले. त्यात त्यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत आपण पक्षाच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेणार. कोणता निर्णय घेणार? असे विचारले असता त्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.









