तिसऱया व शेवटच्या औपचारिक वनडेत भारत 13 धावांनी विजयी, हार्दिकचा 76 चेंडूत 92 धावांचा झंझावात, कोहलीच्या सर्वात जलद 12000 धावा
वृत्तसंस्था / कॅनबेरा
जलद गोलंदाज जसप्रित बुमराहला सापडलेला सूर आणि हार्दिक पंडय़ाच्या आणखी एका वादळी खेळीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया व शेवटच्या, औपचारिक वनडे सामन्यात 13 धावांनी विजय संपादन केला आणि दौऱयातील अपयशी मालिकेची परंपरा अखेर खंडित केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 302 धावा केल्या तर यजमान ऑस्ट्रेलियाला 49.3 षटकात 289 धावांवर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने ही 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
बहरातील हार्दिक पंडय़ाने 76 चेंडूत नाबाद 92 धावांची आतषबाजी केली तर रविंद्र जडेजाने 50 चेंडूत जलद 66 धावा फटकावत आणखी एक उपयुक्त खेळी साकारली. वास्तविक, फलंदाजीला उत्तम असलेल्या या ट्रकवर भारताला 30 धावा कमी पडल्या. पण, तरीही यजमान ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 289 धावांवर रोखत भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने वनडे मालिकेतील व्हॉईटवॉशही टाळला.
भारतीय गोलंदाजांतर्फे शार्दुल ठाकुर (3-51) व पदार्पणवीर थंगसरु नटराजन (10 षटकात 2-70) यांनी दमदार मारा साकारला. मात्र, बुमराहने (9.3 षटकात 2-43) मोक्याच्या क्षणी ग्लेन मॅक्सवेलला बाद करत विजयाच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. याच वेळी हा सामना भारताच्या बाजूने झुकला.
बुमराहने ब्लॉक-होलमध्ये टाकलेल्या एका बिनचूक चेंडूवर मॅक्सवेलचा (38 चेंडूत 59) त्रिफळा उडवला. मॅक्सवेलने यष्टीपासून दूर होत जोरदार फटका मारण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. पण, बुमराहने ही नामी संधी साधत यष्टीचा थेट वेध घेतला आणि त्याची झुंजार खेळी संपुष्टात आणली. वास्तविक, मॅक्सवेलने जवळपास प्रत्येक भारतीय गोलंदाजीचा उत्तम समाचार घेण्यास सुरुवात केली होती. पण, बुमराह येथे मॅक्सवेलपेक्षा सरस ठरला. नंतर यॉर्कर स्पेशालिस्ट नटराजनने देखील आक्रमक गोलंदाजी केली तर शार्दुल ठाकुरने मोक्याच्या क्षणी गडी बाद केले.
पंडय़ा-जडेजाची फटकेबाजी
तत्पूर्वी, बहरातील हार्दिक पंडय़ा व रविंद्र जडेजा यांच्या फटकेबाजीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 300 धावांचा डोंगर सलग तिसऱयांदा सर करता आला. पंडय़ा व जडेजा यांनी सहाव्या गडय़ासाठी 150 धावांची अभेद्य भागीदारी साकारत संघाला उत्तम स्थितीत आणले. पंडय़ा व जडेजाने यांनी 46 ते 48 या 3 षटकात 53 धावांची आतषबाजी केली आणि यामुळे भारताच्या शेवटच्या पाच षटकांत 76 धावा वसूल झाल्या. जडेजाने आपल्या डावात 5 चौकार, 3 षटकार मारले तर हार्दिकने 7 चौकार, 1 षटकार मारला.
धावफलक
भारत : शिखर धवन झे. ऍगर, गो. ऍबॉट 16 (27 चेंडूत 2 चौकार), शुभमन गिल पायचीत गो. ऍगर 33 (39 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), विराट कोहली झे. कॅरे, गो. हॅझलवूड 63 (78 चेंडूत 5 चौकार), श्रेयस अय्यर झे. लाबुशाने, गो. झाम्पा 19 (21 चेंडूत 2 चौकार), केएल राहुल पायचीत गो. ऍगर 5 (11 चेंडू), हार्दिक पंडय़ा नाबाद 92 (76 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 66 (50 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार). अवांतर 8. एकूण 50 षटकात 5 बाद 302.
गडी बाद होण्याचा क्रम : 26 (धवन, 5.5), 2-82 (शुभमन, 15.4), 3-114 (अय्यर, 22.4), 4-123 (केएल राहुल, 25.3), 5-152 (विराट, 31.6).
गोलंदाजी : हॅझलवूड 10-1-66-1, मॅक्सवेल 5-0-27-0, ऍबॉट 10-0-84-1, कॅमेरुन ग्रीन 4-0-27-0, ऍस्टॉन ऍगर 10-0-44-2, ऍडम झाम्पा 10-0-45-1, हेन्रिक्यूज 1-0-7-0.
ऑस्ट्रेलिया : लाबुशाने त्रि. गो. नटराजन 7 (13 चेंडूत 1 चौकार), ऍरॉन फिंच झे. धवन, गो. जडेजा 75 (82 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. राहुल, गो. ठाकुर 7 (15 चेंडू), हेन्रिक्यूज झे. धवन, गो. ठाकुर 22 (31 चेंडूत 3 चौकार), कॅमेरुन ग्रीन झे. जडेजा, गो. कुलदीप 21 (27 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ऍलेक्स कॅरे धावचीत (कोहली-राहुल) 38 (42 चेंडूत 4 चौकार), मॅक्सवेल त्रि. गे. बुमराह 59 (38 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), ऍस्टॉन ऍगर झे. कुलदीप, गो. नटराजन 28 (28 चेंडूत 2 चौकार), सीन ऍबॉट झे. राहुल, गो. ठाकुर 4 (9 चेंडू), झाम्पा पायचीत गो. बुमराह 4 (7 चेंडू), हॅझलवूड नाबाद 7 (7 चेंडू). अवांतर 17. एकूण 49.3 षटकात सर्वबाद 289.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-25 (लाबुशाने, 5.1), 2-56 (स्मिथ, 11.2), 3-117 (हेन्रिक्यूज, 22.2), 4-123 (फिंच, 25.3), 5-158 (ग्रीन, 30.5), 6-210 (कॅरे, 37.4), 7-268 (मॅक्सवेल, 44.3), 8-278 (ऍबॉट, 46.6), 9-278 (ऍगर, 47.1), 10-289 (झाम्पा, 49.3).
गोलंदाजी : बुमराह 9.3-0-43-2, नटराजन 10-1-70-2, शार्दुल ठाकुर 10-1-51-3, कुलदीप 10-0-57-1, रविंद्र जडेजा 10-0-62-1.
शुभमन गिलसारखे ताज्या दमाचे खेळाडू संघात आणल्यानंतर याचा आम्हाला लाभ झाला. आजच्या लढतीतील विजयाची हीच घोडदौड आता टी-20 मालिकेतही पुढे कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. पंडय़ा-जडेजा यांची भागीदारी विशेष लक्षवेधी ठरली.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
आम्ही भारताला उत्तम लढत दिली, असे मला वाटते. हार्दिक पंडय़ा किंवा जडेजा यांच्यापैकी एकाला स्वस्तात बाद करु शकलो असतो तर आमच्यासमोर केवळ 240 धावांचे आव्हान असते.
-ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच
अधिक सामने मिळाले नाहीत, याची खंत व्यक्त करत राहण्याऐवजी ज्या सामन्यात संधी मिळेल, तेथे संघासाठी उपयुक्त योगदान देणे मी अधिक पसंत करतो. सरतेशेवटी संघातील निवड माझ्या हाती असत नाही.
-मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुर.
हार्दिक पंडय़ा व रविंद्र जडेजा यांच्या 150 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळेच आम्ही पराभवाच्या खाईत लोटलो गेलो. ही भागीदारी साकारली गेली नसती तर मालिकेत व्हॉईटवॉशचे आमचे इरादे सफल झाले असते.
–ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल
कोहलीचा जलद 12000 धावांचा विक्रम
कोहलीने या सामन्यात वनडेतील 12000 धावांचा टप्पा गाठत सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. त्याने 242 डावात हा टप्पा गाठला तर सचिनने हा टप्पा 300 डावात गाठला होता. मात्र या वर्षात त्याला वनडेत एकही शतक नोंदवता आले नाही.