नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच: लाचलुचपत विभागाच्या पडताळणीत जाळ्यात
प्रतिनिधी/इस्लामपूर
शेतजमीनीच्या सात बारा उताऱ्यावर चुकीची झालेली नोंद रद्द करुन दुरूस्ती करून देतो, म्हणून फाळकेवाडी येथील तलाठी विकास ऊर्फ राजू तातोबा गुरव (५४, रा. शिवपुरी रोड, कामेरी ता. वाळवा) यांचे विरूध्द ६ लाख रूपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणात सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेतजमीनीच्या सात बारा उताऱ्यावर चुकीची नोंद झाली असून ती चुक दुरूस्ती करून चुकीची नोंद रद्द करून देण्याकरीता तलाठी गुरव याने तक्रारदार यांच्याकडून सहा लाख रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.०९ डिसेंबर २०२१ रोजी दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे गुरव याची पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदार यांचे जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर झालेली चुकीची नोंद रद्द करण्यासाठी लोकसेवक गुरव यांनी तक्रारदार यांचेकडे ६ लाख रूपयांची लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांनी तलाठी गुरव यांचे वरिष्ठ कार्यालयास व पोलीस ठाणेस केले तक्रारी मध्ये गुरव यांची चौकशी सुरू असल्याने गुरव यांन शंका आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारली नाही. त्याच्या विरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपधीक्षक सुजय घाटगे, तत्कालीन पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे , तसेच पोलीस अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, प्रितम चौगुले, अजित पाटील यांनी केली आहे.