प्रतिनिधी/ खेड
खेड पंचायत समितीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कंत्राटी कनिष्ठ अभियंता चंद्रकांत गणपत गमरे (42) पन्नास हजार रूपयांची लाच स्वीकारताना सोमवारी दुपारी 1.45 च्या सुमारास भरणे-गणेशनगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळय़ात अडकला. कामाचे मूल्यांकन वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे कामाच्या रमकमेच्या 2 टक्के प्रमाणे 60 ते 70 हजार रूपयांची लाच त्याने मागितल्याची तक्रार होती.
तक्रारदार हे ठेकेदार असून मंडणगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 14 उपकेंद्रांची दुरूस्ती व अद्ययावतीकरण करण्यासाठी त्यांनी ई-निविदा भरली होती. त्यानुसार 50 लाख 6 हजार 491 रूपये प्रमाणे काम करण्याचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. कामाची देखरेख व मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत कंत्राटी कनिष्ठ अभियंता म्हणून लोकसेवक गमरे याची नियुक्ती करण्यात आली होती.
तक्रारदार यांनी अद्यापपर्यंत पूर्ण केलेल्या कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी गमरे याने 24 सप्टेंबर 2021 रोजी 50 ते 60 हजाराची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. प्रलंबित कामापैकी काही काम झाल्यानंतर त्या कामाचे मूल्यांकन करून बिल मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजाराची लाच स्वीकारताना कंत्राटी कनिष्ठ अभियंता गमरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, सहाय्यक पोलीस फौजदार संदिप ओगले, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे, पोलीस नाईक हेमंत पवार, राजेश गावकर यांनी ही कारवाई केली. कंत्राटी कनिष्ठ अभियंता लाच घेताना जाळय़ात अडकल्याने पंचायत समिती विभागात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यालयामधील लाचेच्या मागणीसंदर्भात काही तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
…









