चांगले शिक्षण घ्यावे आणि नंतर चांगल्या वेतनाची नोकरी करावी, असे बहुतेक युवकांचे स्वप्न असते. तथापि, काहीवेळा ललाटी वेगळेच काही लिहिलेले असते. पण इच्छाशक्ती आणि निर्धार यांच्या जोरावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण गौतमपुरी येथील युवक जुगेंद्र सिंग हा आहे.
जुगेंद्र याचेही स्वप्न शिकून, नोकरी करुन आपल्या आई-वडिलांना समाधान देणे हेच होते. त्यातून त्याने बीएड्पर्यंत शिक्षण घेतले. नोकरीसाठी प्रयत्न सुरु केले. तथापि, भाग्याची जोड मिळाली नाही. संकटांवर संकटे येत गेली. कौटुंबिक समस्यांनाही तोंड द्यावे लागले. तथापि, त्याने निर्धार सोडला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भरता’ मंत्राने त्याला प्रेरणा मिळाली, असे तो स्वतः म्हणतो. त्यामुळे त्याने नोकरी मिळविण्याचा नाद सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची योजना आखली. तथापि, कोणता व्यवसाय करायचा आणि त्यासाठी पैसे कोठून आणायचे हे प्रश्न होतेच. 2016 मध्ये त्याचा विवाहही झाला. त्यामुळे पैशाची आवश्यकता अधिकच जाणवू लागली.
अखेर त्याने आपल्या एका नातेवाईकाच्या फळांचे रस काढून विकण्याच्या व्यवसायात काम सुरु केले. नंतर त्याने स्वतःच हा व्यवसाय सुरु करून त्यात मोठी प्रगती केली. शिवाय तो बीएड् असल्याने व्यवसाय करण्याचा वेळ सोडून उरलेल्या वेळात खासगी शिकवण्या करण्याही करु लागला, काही वर्षांमध्येच या दोन्ही व्यवसायांमध्ये त्याने चांगलाच जम बसविला आहे. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या सर्व आर्थिक समस्या आता सुटल्या असून समृद्ध जीवनाकडे त्याची वाटचाल सुरु आहे. त्याचा हा प्रवास इतरांसाठीही प्रेरणादायक आहे.









