जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयात सध्या एकही फिजिशियन उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. यातून पर्याय काढण्यासाठी भरतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. यामध्ये महिन्याला 1 लाख रूपये वेतन देऊ करूनदेखील एकाही फिजिशियनचा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हा शासकीय रूग्णालयाचा कारभार फिजिशियनविना सुरू आहे. त्यामुळे कोरोना रूग्णालयातही फिजिशियन उपलब्ध करून देता येत नाही. गतवर्षी कोरोना वॉर्डमध्ये फिजिशियन उपलब्ध असल्याने सुरळीत उपचार करणे शक्य झाले होते. आता फिजिशियनची कमतरता असल्याने प्रशासनाकडून हाती घेतलेल्या भरती प्रक्रियायेला एकाही फिजिशियनकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे हा प्रश्न आणखी गंभीर बनल्याचे शिंदे यांनी सांगितले.
लवकरच तोडगा काढणार
एकही फिजिशियनने भरती प्रक्रियेला प्रतिसाद दिला नसला तरी खासगी वैद्यकीय अधिकारी सिव्हील प्रशासनाला मदत करत आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.









