पर्यायी व्यवस्थेचा शोध घेण्याची गरज : खानापूर शहरासह तालुक्यात मोठी समस्या
प्रतिनिधी /खानापूर
एकेकाळी संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्रात जळाऊ आणि इमारतीसाठी लाकडाची मोठी व्यापारपेठ समजल्या गेलेल्या खानापूर आणि लोंढा भागात तसेच तालुक्याच्या इतरही प्रमुख ठिकाणी जळाऊ लाकडाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे स्वयंपाकाच्या जळणासाठी तर सोडाच, पण अंत्यविधीसाठी देखील लाकूड मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. मिळाले तरी त्याचे दर गगनाला भिडणारे यामुळे गरिबांना अंत्यविधी करणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे.
काही वर्षापूर्वी खानापूर तालुक्यात फॉरेस्ट कॉन्ट्रक्टर व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालत होता. तालुक्यातील खानापूर, लोंढा, गुंजी, जांबोटी आदी भागात जळाऊ लाकडाच्या तसेच इमारती लाकडाच्या मोठय़ा वखारी होत्या. महाराष्ट्र आणि कर्नाटकात या भागातूनच जळाऊ आणि इमारती लाकूड पाठवले जात होते. महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने खानापूर तालुक्यातील लाकडावर अवलंबून होते. तालुक्यातील इमारती लाकडाला महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातून मोठय़ा प्रमाणात मागणी होती. पूर्वी रेल्वे वॅगनमधून लाकूड जात होते. यानंतर लाकूड वाहतुकीसाठी ट्रकचा वापर सुरू झाला. त्या काळात लाकूड व्यापाराची मोठी उलाढाल होती. अंत्यविधीसाठी तर लाकूड घेण्यासाठी पैसाही मोजावा लागत नव्हता. पण आता सर्व परिस्थिती बदलली आहे. ज्या तालुक्यातून जळाऊ लाकूड इतर भागात पुरवले जात होते. त्या खानापूर तालुक्यालाच आता जळाऊ लाकूड इतर भागातून आयात करण्याची वेळ आली आहे.
जंगलतोड तर सोडाच, पण खासगी जमिनीतील लाकूड तोडण्यासही आता वनखात्याने बरेच निर्बंध आणले आहेत. यामुळे तालुक्यात लाकूडसाठा अत्यंत मर्यादित स्वरुपात आहे. याचा परिणाम घरच्या स्वयंपाकासाठी आता कुणीही लाकूड वापरत नाही. जंगल भाग वगळता इतर सर्व ठिकाणी गॅसवरच स्वयंपाक केला जातो. पण हिंदू धर्मातील अंत्यविधीसाठी लाकडाची गरज आहे. पण आता अंत्यविधीला देखील लाकूड मिळणे कठीण होऊन बसले आहे. मध्यंतरी काही वर्षे वनखात्याकडून कमी दरात अंत्यविधीसाठी लाकूड पुरवठा केला जात होता. यासाठी केवळ नगरपंचायत किंवा ग्रा. पं. च्या प्रमाणपत्राची सक्ती होती. असे प्रमाणपत्र घेऊन गेले की, वनखात्याकडून अंत्यविधीसाठी पाच ते सात क्विंटल लाकूड अंत्यत कमी दरात मिळत होते. यामुळे अंत्यविधी उरकणे सोपे होते. पण गेल्या काही वर्षापासून वनखात्यानेही लाकूड देणे बंद केले आहे. यामुळे मध्यंतरी काही वर्षे सिरॅमिक प्रोडक्सने अंत्यविधीसाठी वाजवी दरात लाकूड देण्याची सोय केली होती. पण आता सिरॅमिक कारखानाच बंद झाल्याने ती सोय देखील बंद झाली आहे. यामुळे खासगी मालकी कॉन्ट्रक्टरकडून अंत्यविधीसाठी लाकूड खरेदी करावे लागते. पण आता खासगी जमिनीतील लाकूड तोडण्यासही निर्बंध आल्याने खासगी मालकी कॉन्ट्रक्टरकडेही लाकूडसाठा नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. वनखात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन निदान खानापूर, लोंढा, गोल्याळी येथील कार्यालयात अंत्यविधीसाठी कमी दरात लाकूड पुरवठा करण्याची मागणी होत आहे.









