पाकिस्तानातील एक इसम सध्या चर्चेत आला आहे. अबुजार मधू असे नाव असलेल्या या इसमाला पोलिसांनी केवळ त्याच्या केसांमुळे अटक केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेला 28 वर्षीय मधू एक नाटय़कलाकार आहे. तसेच तो मुलांना शिकवतो देखील. 5 जून रोजी मधूला तुरुंगात डांबण्यात आले.
मला माझ्या केसांमुळे रस्त्यांवर थांबवले जाते. पोलीस माझी झडती घेत असतात. दररोज पोलीस किमान तीनवेळा थांबवतात. एका गुन्हेगाराप्रमाणे माझ्याकडे पाहिले जाते. पण पहिल्यांदाच मला अटक करण्यात आल्याचे मधूने सांगितले आहे.

तुझा अवतार बघितलास का? अशा अवतारात मुलांना तू कसा शिकवू शकतोस असे पोलिसांनी विचारले होते. मधूने स्वतःचे दस्तऐवज दाखविल्यावरही पोलिसांनी त्याला पकडून नेले होते. पण मधूच्या मित्रांनी त्याची सुटका करविली आहे. मी माझे लांब केस कापणार नाही. निदर्शनाच्या स्वरुपात केस लांब ठेवणेच पसंत करणार असल्याचे मधूने म्हटले आहे.









