पक्षादेश डावल्याची गंभीर दखल
प्रतिनिधी/ लांजा
शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आणि पक्ष सचिव अनिल देसाई यांची स्वाक्षरी असलेल्या पत्राला केराची टोपली दाखवत लांजा पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदी करण्यात आलेली निवड वादाच्या भोवऱयात सापडली आहे. या निर्णयाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून या दोन्ही पदाधिकाऱयांना पायउतार व्हावे लागणार असल्याची चर्चा आहे. एक ते दोन दिवसात याबाबत पक्ष स्तरावरून पुन्हा आदेश येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
लांजा पंचायत समिती सभापतीपदासाठी पहिल्या वर्षासाठी सभापतीपदासाठी अनिल कसबले तर उपसभापती पदासाठी युगंधरा हांदे तर दुसऱया वर्षासाठी सभापती पदासाठी मानसी आंबेकर व उपसभापती म्हणून श्रीकांत कांबळे यांची नावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आल्याचे पक्ष सचिव अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांना पाठवण्यात आले होते. मात्र आमदार राजन साळवी यांनी सभापतीपदी लीला घडशी तर उपसभापतीपदी दीपा दळवी यांना उमेदवारी देत बिनविरोध निवड केली. त्यामुळे लांजा शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सभापती पदाचे दावेदार कसबले यांनी पक्षश्रेष्ठींनी आपली उमेदवारी जाहीर केली असतानाही आमदारांनी चुकीच्या पद्धतीने आपल्याला डावलत पक्षादेशाचा भंग केल्याचा आरोप केला आहे. लांजातील या नाटय़मय घडामोडींचा वाद पोलिसांपर्यतही गेला होता. मात्र हा विषय आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत पोलीसांनी त्यावर पडदा टाकला आहे.
कसबले यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार राजन साळवी त्यांच्याविरोधात काम केल्याचा आरोप समर्थकाकडून होत असून त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला साळवी यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र आमदार विरोधी गटाने कसबले यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. त्यानुसार कसबले यांचे नाव वरीष्ठ स्थरावरून निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाल्याने सर्व सदस्यांना सुरक्षित एकत्र येण्याचे फर्मान आमदारांकडून काढण्यात आले. मात्र सेनेचे तीन सदस्य कसबळे, मानसी आंबेकर आणि श्रीकांत कांबळे नॉटरिचेबल होते. आमदारांनी वरिष्ठांना परिस्थिती समजावून सांगून सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून लीला घडशी तर उपसभापती दीपा दळवी यांचे उमेदवारी अर्ज भरले.
मात्र कसबेले यांनी आपल्या नावाचा आदेश आल्याने आपण उमेदवारी अर्ज भरण्याचा पवित्रा घेतला. मात्र निर्धारीत वेळेत सूचक अनुमोदक देता न आल्याने त्यांना अर्ज भरता आला नाही. त्यानंतर कसबले यांनी पोलिसांकडेही धाव घेतली. तालुका शिवसेनेतील या घडामोडींमुळे मोठा तणाव निर्माण झाला. अखेर आमदार गटाच्या लीला घडशी सभापती आणि दीपा दळवी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
दरम्यान पक्षश्रेष्ठींचे आदेश असतानाही ते डावलून आमदार साळवी यांनी या निवडी केल्याचा आक्षेप विरोधी गटाने घेतला आहे. त्यातून दोन नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचीही चर्चा आहे. विरोधी गटाने हा विषय वरीष्ठ स्तरापर्यंत लावून धरल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच नव नियुक्त पदाधिकाऱयांवर टांगती तलवार निर्माण झाल्याची चर्चा आहे.









