प्रतिनिधी / लांजा :
लांजा शहरातून गेलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असताना संबधित प्रशासन या धोकादायक खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत समज देऊनही कोणतीच दखल न घेतल्याने अखेर शनिवारी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महामार्गाच्या मध्यभागी वृक्षारोपण करून महामार्गाच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.
राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादीच्या आक्रमक आंदोलनामुळे लांजा शहरात महामार्गावर दुतर्फा ट्रॅफिक जाम झाले होते. दरम्यान लांजाहुन रत्नागिरीच्या दिशेने रूग्ण घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली होती. रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करत माणुसकीचेही दर्शन घडून दिले. लांजा शहरात महामार्गाच्या अर्धवट कामामुळे लांजा शहरात अनेक ठिकाणी दोन एक ते दीड फुटांचे खड्डे पडले आहेत. हे सर्व लांजा तहसीलदार यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव अभिजित राजेशिर्के यांनी प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने महामार्गावर वृक्षारोपण करणार असल्याचे इशारा दिला होता. त्यानुसार लांजा शहरातील साटवली रोड शासकीय गोडाऊन समोर शनिवारी सकाळी महामार्गाच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केले.









