लांजा/प्रतिनिधी
लांजा शहरातील खावडकरवाडी येथे तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकलेल्या बिबट्याला दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाने जेरबंद केले.
खावडकरवाडी येथील चंद्रकांत गुरव यांच्या घराशेजारील भातशेतीला लागून तारेचे कंपाऊड आहे. गुरव हे पहाटे 5 च्या दरम्यान घराबाहेर आले असता त्यांना बिबट्याच्या ओरडण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता बिबट्या तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकला असल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती त्यांनी 5.30 वाजता लांजा वनविभागाला दिली. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱयानी घटनास्थळी धाव घेऊन तारेत अडकलेल्या बिबट्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये स्वतला सोडवण्यासाठी बिबट्याने जोरजोरात हिसके दिल्याने बिबट्याच्या मानेला तारेचा घट्ट विळखा बसला होता. त्यामुळे बिबट्याची तरेतून सुटका करणे वनविभागासमोर मोठे जिकरीचे बनले होते. अखेर वनविभागाने प्रसंगावधान राखून पिंजऱयाच्या सहाय्याने 2 तासाने बिबट्याची तारेतून सुटका केली व बिबट्याला पिंजऱयात बंदीस्त केले. बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीत आल्याने तो तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकला.
बिबट्या नर जातीचा असून 5 वर्षाचा आहे. पिंजऱयात बंदिस्त केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासणी केली. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी र. शी. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, लांजा वनपाल सागर पाताडे, देवरुख वनपाल सुरेश उपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी खावडी येथील स्थानिक ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.









