प्रतिनिधी/ लांजा
तालुक्यातील कोंडय़े येथील एका काजू बागेमधील शेतघरात ठेवलेल्या काजूच्या तब्बल 27 गोण्या चोरटय़ाने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोंडय़े बावळेवाडी येथे ही काजू बाग आहे. या बाबत अज्ञात चोरटय़ाविरोधात लांजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, कोंडय़े बावळेवाडी एस. टी. स्टॉप येथील हुंडळ्याची जाळ या ठिकाणी रत्नागिरी येथील शेतकरी राजेंद्र भालचंद्र काळे यांच्या मालकीची 17 एकर क्षेत्र असलेली बाग आहे. बागेत शेतघर असून संपर्ण काजूबाग बंदिस्त आहे. या बागेची देखरेख करण्याचे काम कोंडय़ेतीलच शांताराम सखाराम रांबाडे हे करतात. रांबाडे हे दिवसभर बागेतील काम आटोपून सायंकाळी 7 च्या सुमारास शेतघर तसेच गेटला कुलूप लावून घरी गेले. मंगळवारी सकाळी ते पुन्हा बागेत आले असता रांबाडे यांना गेटचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी पुढे शेतघराकडे जाऊन पाहिले असता शेतघरासमोरील दरवाजाचेही कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. घरात जाऊन पाहिले असता आतील 50 किलोनी भरलेली काजूची तब्बल 27 पोती चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीला गेलेले 50 किलो काजू 37 हजार 500 रुपये किंमतीची होते. राबांडे यानी लगेचच लांजा पोलीस स्थानकात येऊन घटनेची फिर्याद दिली. त्यानुसार लांजा पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरगावकर करत आहेत.









