प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी 25 लाखाची तरतूद – पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, याचे गांभीर्य लक्षात घेऊन लहान मुलांसाठी 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येत असून ते तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. तसेच प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाची येणारी तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्हय़ात पन्नास खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी दाखल होणाऱया मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने, घरच्यासारखी ट्रिटमेंट दिली जाईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच आपण जिल्हय़ातील खासगी बालरोग तज्ञ डॉक्टरांशी या विषयावर चर्चा केली असून सर्वांनी मदत करण्याचा शब्द दिला आहे. तसेच ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अमित सैनी यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले.
प्लाझ्मा थेरपी मशीनसाठी 25 लाखाची तरतूद
प्लाझ्मा थेरपी मशीन जिल्हय़ासाठी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर 25 लाख रुपयांची तरतूद या मशीनसाठी करण्यात आली आहे. आता या थेरपीबाबत मतमतांतरे असली, तरी त्याचा फायदा भविष्यात नक्कीच जिल्हय़ातील रुग्णांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत
पालकमंत्री सामंत यांनी झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लॉकडाऊनला प्रतिसाद दिला, त्याबद्दल जिल्हावासीयांचा आपण आभारी आहे. त्याचा फायदा जिल्हय़ातील रुग्ण कमी होण्यास होत आहे. त्यामुळे निश्चितच वाढलेली कोरोना रुग्णसंख्या भविष्यात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘माझा सिंधुदुर्ग, माझी जबाबदारी’, अशी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत 2 लाख 90 हजार 12 लोकांपर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात 56 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण शोधण्यात त्याचा फायदा झाला आहे. हे रुग्ण सापडल्याने या रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखता आला आहे. ही मोहीम आतापर्यंत 40 टक्के पूर्ण झाली असून, उर्वरित 60 टक्के लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे. पुढील सहा दिवसांत मोहीम पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनंतर मोहीम राबवली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा
कोव्हिशिल्ड लस पुरेशा प्रमाणात मिळत आहे, पण कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा आहे. त्याची मागणी केली असून लवकरच लसीचा पुरवठा होईल. त्यानंतर लवकरच जास्तीत जास्त लोकांना लस मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले.
येत्या काळात शिक्षक व फ्रन्टलाईनवर लवकरच लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. लॉकडाऊन वाढणार का? याबाबत विचारले असता त्यांनी अद्याप आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाही, असे सांगून अधिक बोलणे टाळले.
जिल्हय़ाच्या सीमांवर कडक बंदोबस्त
नाहक फिरणाऱया लोकांवर कारवाई करण्यासाठी गोवा व खारेपाटण येथे जिल्हय़ाच्या सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच भरारी पथक नेमून स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्हय़ात फिरण्याचा सूचना दिल्या आहेत. अवैध दारू वाहतुकीबाबतही कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.









