मागील वषी कोरोनाने भारतात प्रवेश केला त्यावेळी लहान मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण अतिशय कमी होते, पण सध्या जानेवारी, फेब्रुवारीपासून 0 ते 18 वयोगटातील सुमारे साठ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाच्या संसर्गाचे वृत्त सातत्याने ऐकण्यास मिळत आहे. पण हे ऐकून घाबरून जाऊ नका, यात समाधानाची बाब ही आहे की ज्या मुलांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे त्यांना सौम्य लक्षणे आहेत, अत्यवस्थ होण्याचे व ऍडमिट करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मृत्यूही अगदी बोटावर मोजण्याइतका आहे. जी बालके मृत झाली आहेत त्यांना पूर्वी व्याधी किंवा उशिरा निदान झाल्याने ती बालके दगावल्याची माहिती मिळते. सध्या भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये एकूणच मागील वर्षाच्या तुलनेने या व्याधीचे संक्रमणाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.सर्वच वयोगटातील शहरी व ग्रामीण भागातील लाखाहून अधिक लोकांना संसर्ग होताना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या तीव्र संक्रमणाचे कारण म्हणजे सध्याच्या कोरोना व्हायरसमधील त्याच्या स्वरूपातील झालेला बदल (म्युटेशन). कोरोनाच्या शिंगामधील रचनेच्या बदलामुळे त्याची संसर्ग क्षमताही दुपटीने वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून लहानापासून तरुण मुलांनासुद्धा जादा प्रमाणात कोरोनाची बाधा होत आहे. परंतु समाधानाची बाब ही आहे की बदल झालेल्या कोरोना व्हायरसची मारक क्षमता कमी असल्याने व जन्मतः बालकांमधील रोगप्रतिकारक शक्ती सक्षम असल्याने, बालकांना होणारा आजार हा सौम्य प्रकारचा असतो. त्यामुळे पालकांनी घाबरण्याचे कारण नाही, काळजी व सावधगिरी बाळगणे मात्र गरजेचे आहे. खूप ताप येणे, सर्दी, घसा दुखणे, खवखवणे, कोरडा खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, संडास, थकवा, वास व चव जाणे अशी फ्लूप्रमाणेच लक्षणे असतात. जर जास्त श्वास वाढणे, सतत जास्त ताप येणे, शरीरातील ऑक्सिजन कमी होणे, हात-पाय थंड होऊन निळे पडणे, छातीत दुखणे, लघवी कमी होणे, मुले बेचैन असणे अशा प्रकारची अनेक लक्षणे असणाऱया मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते व तात्काळ बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. वरील सौम्य लक्षणे असणारी बालके जी नियमित खातात, पितात, खेळतात, झोपतात त्यांची चिंता करू नये. ज्या मुलांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे गंभीर लक्षणे आहेत व या सोबतच त्याचा गेल्या 15 दिवसात कोरोना रुग्णांशी संपर्क आला आहे अथवा बाधित भागातून प्रवास केला आहे, घरच्यापैकी कोणास कोरोना झाला आहे, आपल्या भागात कोरोनाची लागण जास्त झाली आहे, अशा परिस्थितीतील मुलांची डॉक्टरांच्या सल्ल्याने घशातील स्रावाची Rt-pcr टेस्ट करून कोव्हिडचे निदान केले जाते. शरीरातील ऑक्सिजन, इन्फमेट्री मार्कर्स रक्त तपासण्या, एक्स-रे चेस्ट, अशा तपासण्यांमध्ये गंभीर स्वरूप आढळल्यास बालरोग तज्ञ ऍडमिट करून उपचार करतात. नुकतीच जन्मलेली बालके व ज्या बालकांना पूर्वीचा जन्मजात आजार आहे अथवा त्यावरील औषधे सुरू आहेत, हृदय विकार, किडनी विकार, मधुमेह, रक्ताचे विकार, कॅन्सर, प्रतिकारक शक्ती कमी आहे अशी बालके जर कोरोना संक्रमित झाली तर त्यांना श्वासाच्या त्रासामुळे ऍडमिट करावे लागत आहे. याच गटातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण दिसून आले आहे. कोविड आजार सर्वांसाठीच नवीन आहे. विषाणूमध्ये सतत होणारे म्युटेशन त्यामुळे सध्या कोरोना होऊन गेलेल्या बालकांमध्ये पुढील काही महिने सतत ताप येणे, शरीरातील सर्व अवयवाना, हृदयाला सूज येणे (हायपर इन्फ्लामेटरी सिंड्रोम) अशी लक्षणे दिसत आहेत, हा एक चिंतेचा विषय आहे. त्यासाठी बालरोग तज्ञांचा सल्ला व उपचार आवश्यक आहे. लहान मुलांना कोरोना संसर्ग सौम्य का होत आहे याची वैद्यकीय कारणे पुढीलप्रमाणे –
1) स्तनपान करणाऱया बालकांना आपल्या मातेच्या दुधातून खूप उत्तम प्रकारच्या अँटीबॉडीज मिळत असतात त्यामुळे लहान मुलांमधील कोरोना संक्रमण काही प्रमाणात रोखता येत असावे. 2)जन्मानंतर पहिल्या आठवडय़ातच टीबी होऊ नये म्हणून बीसीजी व इतर आजारावरील लसी बाळास दिल्या जातात. अशा विविध लसी घेतल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती सक्षम असते. बीसीजीसारख्या लसी शरीरात इम्मुनो मॉडय़ुलर व क्रॉस प्रोटेक्शन म्हणून काम करीत असल्याने, मुलांमधील कोरोनासारख्या संक्रमणापासून वाचवण्यास उपयुक्त ठरत असावी. यावर सध्या संशोधन सुरू आहे. 3) जन्मापासूनच लहान मुलांची प्रतिकारशक्ती मोठय़ापेक्षा वेगळय़ा प्रकारे काम करीत असते. बालके विविध प्रकारच्या संसर्गाचा प्रतिकार करीत असतात. विविध आजारावरील लसी घेत असतात. यामुळे तयार झालेल्या ऍण्टीबॉडीजमुळे लहान मुलांमध्ये संक्रमण सौम्य होत असावे. 4) कोरोना विषाणूंचा आपल्या शरीरातील पेशींमध्ये शिरकाव होण्यासाठी त्या पेशीवरील प्रोटीन ACE-2 रिसेप्टरची गरज असते. लहान मुलांमध्ये हे रिसेप्टर्स कमी प्रमाणात असतात. ACE 2 रिसेप्टर श्वसन संस्थेच्या वरील भागात जास्त असल्याने कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये नाक, घसा, तोंड इतकाच संसर्ग मर्यादित राहतो. त्यामुळे लक्षणे सौम्य फ्लू स्वरूपाची येतात. तसेच या एसीई रिसेप्टरची संख्या श्वास नलिका, फुप्फुसे अशा खालच्या भागात अत्यल्प असल्याने हा प्रादुर्भाव पोहोचत नाही म्हणून निमोनिया, श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजनची कमतरता अशी जीवघेणी परिस्थिती लहान मुलांमध्ये उद्भवत नाही. 5) लहान मुले कारोना संसर्गापासून दगावत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे ‘सायटोकायईन स्टॉर्म’ लहान मुलांमध्ये हे वादळ तयार होत नाही. मोठय़ांमध्ये कोरोनाचा नाश करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती खूप मोठय़ा वादळाप्रमाणे (इम्यून ओव्हर रिस्पॉन्स) प्रतिहल्ला करते. याचा फायदा होण्यापेक्षा धोकाच जास्त होतो, या सर्वांचा परिणाम म्हणून सर्व अवयव कार्य करण्याचे थांबतात (मल्टिपल ऑर्गन फेल्युअर) त्याचा परिणाम मृत्यूत होतो. परंतु बालकांमध्ये असे ‘सायटोकायईन वादळ’ होत नसल्याने बालकांचे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे.
कोरोना लसीकरण- 0 ते 18 वयोगटातील मुलांना अजून कोरोना लसीकरण दिले जात नाही. फायझर, मॉडरना व इतर कंपन्या सर्व गटातील मुलांना लस देता यावी म्हणून ब्रीज स्टडी ट्रायल घेत आहेत. या वर्षाअखेर लहान मुलांनासुद्धा लसीकरण सुरू होईल. अमेरिकेत फायझर कंपनीची लस 12 वर्षापुढील सर्वांना देता येते. भारत बायोटेकचे नाकावाटे देता येण्याच्या लसीवर ट्रायल सुरू आहेत.
मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून, तसेच झालाच तर घरी कोणती काळजी घ्यावी?
1) मुलांना शक्मयतो बाहेर पाठवू नका. 2) मुले कोरोना नियमाचे पालन करतील ही अपेक्षा धरू नका. 3) घरच्यांनी बाहेर येताना आपण स्वतः वाहक ठरणार नाही याची काळजी घ्या. 4) घरात येताना कपडे बदलून निर्जंतुक होऊनच मुलांच्या जवळ जा. 5) आपला मास्क मुलांपासून दूर ठेवा. 6) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. 7) मास्क, सुरक्षित अंतर, हॅण्ड सॅनिटायझर याबद्दल मुलांना माहिती द्या. 8) मुलांना शाळेत पाठवू नका. 9) बाहेरील पदार्थ आणून खाणे टाळा. 10) नाक, तोंड, डोळे यांना हाताचा स्पर्श टाळा. 11) मुलांशी मोकळे बोला, त्यांना कोरोनाविषयी सर्व माहिती चित्रे काढून, गोष्टीरूपाने समजून सांगा. 12) घरी सर्वांनी लस घ्या. 13) मुलांना सकस आहार द्या, प्रोटीन, झिंक, विटामिन डी-3, दूध-हळद याचा नियमित वापर करा. 14) पाच वर्षाखालील मुलांना आयसोलेशन अवघड असते, त्यांना गांभीर्य समजत नसते, त्यामुळे आईने स्वतः त्रिसूत्री पाळून लहान मुलांचा सांभाळ करावा. 15) माता किंवा बाळ यापैकी कोणीही कोरोना संक्रमित असेल तरी आईचे दूध पाजणे बंद करू नये. दुधावाटे संक्रमण होत नाही. जर काही अडचणी असल्यास मातेचे दूध पिळून बाळास पाजावे. आईने बाळास दूध पाजवताना नेहमी मास्कचा वापर करावा, पाजण्यापूर्वी हात निर्जंतुकीकरण करावेत. जमेल तेवढे अंतर राखण्याचा प्रयत्न करावा. 16) बाळ खेळण्याचे ठिकाण, फरशी, त्याची खेळणी दर तीन तासांनी निर्जंतुक करून पुसून घ्या. 17) घरातील हवा खेळती राहील हे पहा. 18) एसीचा वापर करू नका. 19) तीन वर्षाखालील मुलांना मास्क वापरायला देऊ नये. अशा काही गोष्टी सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर पाळाव्यात. सर्वत्र कोरोना विषाणूंनी आपला संसर्ग मोठय़ा प्रमाणावर व्यापला आहे. लहान मुलांना गंभीर धोका नसला तरी मुलांची व सर्वांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
डॉ.संजय पंतबाळेकुंद्री








