कोरोना- आर्थिक परिस्थितीचा परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या 12 दिवसांवर येवून ठेपल्याने सर्वत्र तयारीची लगबग सुरू आहे. गणेश मूर्तीकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळीही मूर्ती शाळांमध्ये लगबग दिसत आहे. यावषी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे लहान आकारातील मूर्तींनाच सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे मूर्तीकारांनीही लहान मूर्तींवरच अधिक भर दिला आहे.
बेळगाव परिसरात मोठय़ा उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणरायाची मूर्ती घरामध्ये आणून विधीवतपणे पूजन केले जाते. हा आनंदाचा सण येण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने जय्यत तयारी सुरू आहे.
बेळगावमध्ये अनेक मूर्तीकारांनी मागील अनेक महिन्यांपासून गणेशमूर्ती तयार करण्यास सुरूवात केली होती. त्याचसोबत कोल्हापूर, पेण येथूनही अनेक गणेशमूर्ती बेळगावमध्ये दाखल झाल्या आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून थंडावलेला व्यवसाय, जाणवणारी आर्थिक चणचण यामुळे लहान गणेशमूर्ती घेण्याकडे भाविकांचा कल आहे. संध्याकाळच्या सुमारास गणेशमूर्ती ठरविण्यासाठी मूर्ती शाळांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.
मागील वषीच्या तुलनेत काही प्रमाणात वाहतूक खर्च वाढल्याने मूर्तीची किंमत थोडीशी वाढविण्यात आली आहे. यावषी पीओपीच्या मूर्ती 600 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. तर शाडूच्या मूर्ती 800 रुपयांपासून आकारमानानुसार विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. एकूणच यावषी लहान गणेशमूर्तींकडे नागरिकांचा कल अधिक असल्याचे दिसत आहे.
शाडूच्या मूर्तींना मागणी अधिक : शुभम बाळेकुंद्री (मूर्तीकार- वडगाव)

यावषी कोरोनामुळे लहान मूर्तींवर भाविकांचा भर अधिक आहे. पीओपीपेक्षा शाडूच्या मूर्तींना मागणी अधिक असल्याने यावषी शाडूच्या मूर्ती अधिक प्रमाणात बनविल्या आहेत. दरामध्ये मागील वषीच्या तुलनेत तितकासा फरक नसल्याची माहिती मूर्तीकार शुभम बाळेकुंद्री यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.









