संशोधकांनुसार जर 60 टक्के लोकांना लस देण्यात आल्यास ती 80 टक्क्यांपर्यंत प्रभावी असावी, तरच महामारी संपुष्टात आणण्यास 100 टक्के यश मिळणार आहे. सामान्य स्थितीत परतण्यासाठी लस प्रभावी असणे आवश्यक असल्याचे अमेरिकेच्या क्यूनी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
प्रभावी असणे आवश्यक
लसीच्या चाचण्यांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना सांगितले जात आहे. या चाचण्यांमध्ये लवकरात लवकर सामील होऊन जीवन पूर्वीप्रमाणे जगता येणार आहे. लस उपलब्ध होण्याचा अर्थ ती प्राप्त केल्यावर परत सामान्य जीवन जगता येईल असा होत नाही. लस उपलब्ध होण्यापेक्षा ती किती प्रभावी आहे हे महत्त्वाचे ठरणार असल्याचे संशोधक ब्रूस वॉय ली यांनी म्हटले आहे. या अध्ययनाचे निष्कर्ष धोरणनिर्माते आणि लस तयार करणाऱयांना त्यांचे लक्ष्य काय हे समजून घेण्यास मदत होणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
सोशल डिस्टन्सिंग राहणार

कॉम्प्युटर सिम्युलेशनवर आधारित अध्ययनानुसार 80 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी लस बेकार ठरेल असाही याचा अर्थ होत नाही. उलट लस कमी प्रभावी ठरल्यास कुठल्या न कुठल्या प्रकारे सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवावे लागणार आहे. लोक पूर्वीप्रमाणे मिळून-मिसळून राहू शकणार नाहीत.
निर्भरता कितपत योग्य
एखाद्या आजारासाठी लस तयार झाल्यावर ती कुठल्याही पॅथोजनच्या विरोधात इम्युन रिस्पॉन्स विकसित करते. अँटीबॉडी कमजोर झाल्याने लसीच्या प्रभावीपणावरही प्रश्न उपस्थित होतात. याच कारणामुळे महामारी संपुष्टात आणण्याच्या पद्धतींवरील चिंता वाढल्या आहेत. किंग्स कॉलेज लंडनच्या अध्ययनात 100 कोरोनाबाधितांना सामील करण्यात आले. त्यांच्यात विषाणूच्या विरोधात अँटीबॉडी विकसित झाल्या होत्या. स्वयंसेवकांमध्ये 77 टक्के पुरुष होते आणि सरासरी वय 55.2 वर्षे होते. सुमारे 100 दिवसांपर्यंत त्यांचे निरीक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरात सार्स-कोव्ह-2 विषाणू नष्ट करण्यासाठी विकसित अँटीबॉडीची तीव्रता तपासण्यासाठी लक्षणांच्या प्रारंभापासून हे काम करण्यात आले. ज्याप्रकारे सामान्य फ्ल्यूचा सामना करणाऱया अँटीबॉडी काही महिन्यांमध्ये नाहिशा होतात, तोच प्रकार कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिसून आला आहे.









