सध्या भारतासह जगभरात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे लसीकरणाकडे नव्या दृष्टीने पाहिले जात आहे. एकाद्या देशाच्या संपूर्ण लोकसंख्येचेच लसीकरण करावयाचे असल्याने लसींची वाहतूक आणि साठवणूक यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्ड चेन किंवा शीतसाखळीच्या माध्यमातून ही लस देशाच्या कानाकोपऱयात न्यावी लागत आहे. ही प्रक्रिया खर्चिक असल्याने ती किफायतशीर कशी करता येईल, यावर विविध उपाय शोधले जात आहेत.

भारतीय संशोधकांना असा एक प्रभावी उपाय सापडला आहे. पीएसआयटी संस्थेच्या वैज्ञानिकांनी अशा प्रकारचे व्हॅक्सिन स्टोरेज डिव्हाईस बनविले आहे. या उपकरणामुळे कोल्ड चेनला पर्याय सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. याचे वैशिष्टय़ असे की त्यात बर्फ घालण्याची आवश्यकता असते. हे उपकरण पोर्टेबल असल्याने त्याची वाहतूकही सहजगत्या केली जाऊ शकते, असे सांगण्यात येते.
लस सुरक्षित राखण्यासाठी सात ते आठ डिग्री सेल्शियस तापमानात ती सातत्याने साठवावी लागते. वाहतूक करताना तर लस थंड ठेवावी लागतेच, शिवाय रुग्णालयातही ती रुग्णांमध्ये टोचली जाईपर्यंत थंड ठेवावी लागते. अन्यथा ती खराब होते. हा शीतकरणाचा खर्च मोठा असतो. मात्र या उपकरणामुळे तो बराच कमी होईल आणि लसींचे शेल्फ लाईफ (टिकावूपणा) वाढेल असा संशोधकांचा दावा आहे. या उपकरणावर करण्यात आलेले प्रयोग चांगलेच यशस्वी झालेले असून लवकरच त्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन हाती घेतले जाणार आहे.









