रात्रीची वेळ होती. जेवणं झाली होती. झोप येत नव्हती म्हणून हरिदास आणि त्याची बायको आपापल्या मोबाईलवर व्हॉट्सअप बघत होते. त्यावर आलेले चित्रविचित्र, खरे-खोटे (बहुतांश खोटेच) संदेश वाचत होते. अचानक दोघांच्याही फोन्सवर एकाच वेळी एकच मेसेज झळकला. दोघे उत्सुकतेने वाचू लागले.
‘हसरी ट्रव्हल्स’ या प्रसिद्ध यात्रा कंपनीने लस टुरिझम संकल्पनेच्या अंतर्गत लस-री ट्रव्हल्स नावाची नवीन उपकंपनी काढली होती. पर्यटन आणि लसीकरण यांचा अद्भुत संगम साधला होता. त्यातील एक योजना होती ‘टू रशिया विथ लव्ह, फ्रॉम रशिया विथ लस’. ही चाळीस दिवसांची योजना होती. यात प्रवासी मॉस्कोच्या विमानतळावर उतरले की त्यांना तिथेच स्पुटनिक लसीचा पहिला डोस देऊन चोवीस तास विश्रांतीसाठी हॉटेलमध्ये ठेवायचं. नंतर एक महिना रशियाभर स्थळदर्शन. तिथून भारतात परतताना विमानतळावर दुसरा डोस आणि चोवीस तास विश्रांती घेऊन घरी परत. दुसरी योजना होती ‘अब की बार कोरोना ठार’ या योजनेत प्रवाशांना एक महिना अमेरिकावारी घडणार होती.
वरील दोन्ही योजना महागडय़ा वाटणाऱया प्रवाशांसाठी किंचित कमी खर्चाची योजना होती. माले आणि इतर ज्या छोटय़ा देशांना भारताने लस पुरवली होती त्या देशांनी कृतज्ञतेपोटी भारतीय प्रवाशांसाठी स्किम आखली होती. विमानतळावर प्रवाशांचे आगमन झाले की त्यांना लसीचा पहिला डोस आणि कांदेपोहे, इडली-मेदू वडा-डोसा, उपमा, गोड शिरा असा खास भारतीय नाष्टा, उपवासवाल्या प्रवाशांसाठी साबुदाणा खिचडी असा बेत होता. आठ दिवस स्थळदर्शन झाल्यावर परतताना लसीचा दुसरा डोस आणि पुरणपोळीचं जेवण असा जंगी मेन्यू.
याहून स्वस्त योजना हवी असलेल्या प्रवाशांसाठी गावांतर्गत छोटी स्किम होती. सकाळी निघून संध्याकाळी परत येण्याची योजना. यात एक सरप्राईज आयटेम होता. नियोजित तारखेला प्रवाशांनी आपापले पोळीभाजीचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन पहाटे कंपनीच्या कचेरीत जमायचं. त्या दिवशी ज्या केंद्रावर लस उपलब्ध असेल तिथे बस जाईल. कंपनीचा प्रतिनिधी रांगेत उभा राहील. तोवर तोंडावर मास्क बांधूनच प्रवासी गाण्याच्या भेंडय़ा वगैरे बैठे खेळ खेळतील. काहीजणांना लस मिळेल, काहींना नाही. निघताना कंपनीतर्फे सर्वांना कागदी पेल्यात कटिंग चहा…
“जळली मेली ती यात्रा कंपनी… उद्या पहाटे लसीकरण केंद्रावर रांग लावायला जायचंय. झोपू आता.’’ असं पुटपुटत बायकोने फोन बंद केला. हरिदासनेही तेच केलं.









