कोरोनाची लस आता दृष्टिपथात आली आहे. कोरोनाची भीतीदेखील आटोक्मयात आली आहे. तसे आपले बांधव कोरोनाला कधी भ्याले होते म्हणा. पोलिसांच्या भीतीने मास्क वापरायचे, वापरतात. पण अनेकदा तो नाकाखाली किंवा थेट हनुवटीवर बांधलेला असतो. काहीजण छान नाकावर बांधतात. पण मधूनच मास्क बाजूला करून तोंडातला तंबाखूचा बार थुंकतात. देव त्यांचे भले करो. लस आली तरी यातले अनेक शूरवीर ती टोचून घेतलीच अशी खात्री नाही.
लस आली आणि आजवर होऊन गेलेल्या सरकारांनी देवी, बीसीजी, पोलिओ वगैरे लशी सर्व जनतेला मोफत टोचून अनेक रोगांचं निर्मूलन केलं. तसं विद्यमान सरकारनं केलं तर कोटय़वधी गरीबांचे जीव वाचतील. लस विकायला ठेवली तर मात्र कठीण आहे. कठीण आहे तर त्यावर विनोद करून दु:ख विसरायला काय हरकत आहे? मराठी दुकानदार आणि मराठी माणसे या लशीची कशी ऐशीतैशी करतील…
रविवारी सकाळी तमाम बेकऱयांवर आधी ‘पॅटीस आहेत’ अशी पाटी असते, दुपारी ‘पॅटीस संपले’ किंवा मिठाईच्या दुकानात ‘बाकरवडी मिळेल’ आणि ‘बाकरवडी संपली’ अशा पाटय़ा असतात. त्या धर्तीवर औषधांच्या दुकानात पाटय़ा दिसू शकतील.
देशबंधूनो विचार करा, लशीपेक्षा आयुर्वेदिक काढा बरा
आमच्याकडे बालकामगार काम करीत नाहीत
आमचे येथे सर्व प्रकारच्या कंपन्यांनी बनवलेल्या लशी मिळतील.
आमचे येथे कुंडली पाहून जन्मराशीनुसार लस मिळेल. कुंडली नसेल तर जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थान पाहून कुंडली बनवून दिली जाईल
एक्सपायरी डेट संपलेल्या लशीवर पन्नास टक्के सवलत
जेनेरिक लस उपलब्ध आहे.
कोरोनाच्या तीन लशींवर अडुळसा सिरपची छोटी बाटली किंवा तीन मास्क मोफत
भांडवलशाही के इस दौर में चायनीज लस की गैरंटी न मांगे
लशीमुळे इम्युनिटी कमी झाल्यास कंपनी जबाबदार नाही.
लस मिळेल/लस संपली.
लस फ्रिजमध्ये ठेवू नये. आज नेलेली लस आजच वापरावी.
लशीबरोबर इंजेक्शन आणि सुईचे वेगळे पैसे पडतील.
लस उपवासाला चालते.
दुपारी बारा ते चार बंद राहील/आमची कोठेही शाखा नाही.
आणि फूटपाथवर मांडलेली पथारी–
पेणचे कडवे वाल, कळीचे परकर आणि कोरोनाची लस मिळेल. परकर बदलण्याची वेळ-दुपारी चार ते पाच.








