बेळगाव / प्रतिनिधी :
कोरोना रुग्णांची संख्या जगात सध्या झपाटय़ाने वाढत आहे. या आजारावर खात्रीशीर व प्रभावी औषध उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण बळी पडताना दिसत आहेत. याचा प्रसार रोखण्यासाठी परिणामकारक लस शोधणे गरजेचे बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या जवळजवळ 11 कंपन्यांमार्फत कोरोनावरील लस शोधण्यात आघाडी सुरू आहे. भारतामध्ये सध्या दोन स्वदेशी लसींची मानवी चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. उंदीर व संशयावरील लसीची (टॉक्सिसीटी) स्टडीज यशस्वी झाल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीएलजीआय) ने मानवी चाचणीला परवानगी दिली. प्राथमिक टप्प्यातील मानवी चाचणी सध्या भारतामध्ये सुरू आहे. भारत बायोटेक व ऑक्सफर्ड विद्यापीठांशी करार केलेल्या सेरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियामार्फत बनविलेल्या कोरोना लसीने आम्हा भारतीयांमध्ये आशेचा किरण निर्माण करताना दिसत आहे.
कोणत्याही आजारावरील लस ही त्या त्या किटाणूपासून वेगवेगळय़ा पद्धतीने बनविली जाते. ही लस दिल्यानंतर त्या आजाराच्या किटाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करून संरक्षण मिळविले जाते. Live attenuated vaccine, killed vaccine, sub unit vaccine, conjugated vaccine, combination vaccine इ. अशा अनेक प्रकारच्या लस बनविल्या जातात. लस ही ऍक्टिव्ह इम्युनिटीसाठी वापरली जाते. तयार असलेले इम्युनोग्लोब्युलिन्स immunoglobulins (Normal human Immunoglobulins व Specific human immunoglobulins Passive Immunity साठी वापरले जातात. परंतु या सर्व प्रकारांपैकी कोणत्या प्रकारची लस संरक्षणासाठी अधिक फायदेशीर ठरेल, याचे संशोधन करून पडताळणी करणे जरुरीचे असते. कोरोनावरील लस बाजारात येण्यापूर्वी खालील अनेक गोष्टींचा उलगडा होऊन पडताळणीची गरज आहे.
सुरक्षितता : उंदीर व सशावरील प्रयोगात सुरक्षित व विषाक्तता (टॉक्सिसीटी) रहित असल्याचे आढळले असले तरी मानवी उपयोगासाठी किती सुरक्षित आहे, हे हजारो लोकांना कोरोना लस टोचल्यानंतरच निष्कर्ष काढणे शक्मय होईल. अल्पकालीन व दीर्घकालीन दुष्परिणाम शोधणे हितावह ठरेल.
संरक्षणात्मक कार्यक्षमता (Protection Efficiency) :
लस सुरक्षित असली तरी तिच्यापासून किती प्रमाणात लस घेतलेले लाभार्थी सुरक्षित होतात, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसांनी आपल्या शरीरात प्रभावी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, किती कालावधीसाठी परिणामकारक आहे, लस दिल्यानंतर प्रभावी प्रतिपिंडे व टी सेल्स किती प्रमाणात विकसित होतात इ. तपासणे जरुरीचे आहे.
मात्रा (डोस) : कोरोनावर तयार झालेली लस किती मात्रामध्ये, किती वेळा दिल्यास जास्तीत जास्त संरक्षण मिळेल, हेही पाहणे आवश्यक आहे.
मार्ग (रुट): कोणत्या मार्गाने लस दिल्यास किफायतशीर ठरेल व लोकांची स्वीकृती वाढेल हेही तपासणे अगत्याचे आहे. साधारणपणे स्नायूमध्ये (आयएम), त्वचेखाली (एससी), त्वचेमध्ये (आयडी) टोचणे, तोंडावाटे (ओरल), नाकावाटे (स्प्रे, थेंब) इत्यादी हे लस देण्याचे मार्ग आहेत.
सध्या चर्चेत असलेली कोरोनावरील लस आशादायक असली तरी वरील सर्व बाबी पडताळून पाहून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास बराच कालावधी लागण्याची शक्मयता आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी परिणामकारक, सुरक्षित व माफक दरातील लस उपलब्ध होईल, अशी आशा आपण जरूर बाळगुया. तोपर्यंत वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता पाळणे, मास्क वापरणे, विनाकारण बाजारात न फिरणे, सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, घाबरून न जाता वेळीच उपचार घेऊन स्वत:ची काळजी घेणे एवढेच आपल्या हाती आहे.









