दोन दिवसांपूर्वीच घेतला होता चिनी लसीचा डोस
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
चीनकडून प्राप्त झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 18 मार्चला त्यांनी चीनकडून प्राप्त ‘सिनोफार्म’ लस घेतली होती. आता कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्वतः होम क्वारंटाईन केले असून घरीच राहून उपचार घेण्यास प्राधान्य दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या ‘सिनोफार्म’ ही एकमेव लस उपलब्ध आहे. या लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य आहे. देशात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत सध्या इम्रान खान यांनी केवळ पहिला डोस घेतला होता, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियम आणि समन्वय विभागासाठी इम्रान खान यांचे विशेष साहाय्यक म्हणून काम करणारे फैजल सुलतान यांनी ट्विट केले आहे. चीनने 1 फेब्रुवारीला पाकिस्तानला ‘सिनोफार्म’चे पाच लाख डोस पुरविले होते. यानंतर पाकिस्तानमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली आहे.