जिल्हा रुग्णालयात पैसे घेत असल्याचे उघड
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात लसीसाठी मारामार सुरु आहे. लसीकरण केंद्राबाहेर रात्रीपासून रांगा लागल्या जातात. लस मिळवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पाचशे रुपयांच्या मानधनावर नेमलेल्या कर्मचाऱयास पैसे घेत असल्याच्या तक्रारीवरुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी तडकाफडकी कामावरुन काढून टाकले. तो कर्मचारी लस मिळवून देण्यासाठी 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत मिळेल एवढे पैसे घेत होता. पैसे घेतलेल्या व्यक्तीला रांगेत न उभे करता लस दिली जात होती. दरम्यान, प्रथमदर्शनी या एकाच कर्मचाऱयावर कारवाई झाली असली तरी यामागे आणखी कोण कोण आहे हे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
सातारा जिह्यात कोरोना विरोधातील लस कधी येते आणि कधी नाही याचा नियम नाही. लस घेण्यासाठी केंद्राच्या बाहेर रात्रीच्या रांगा लागून नंबरसाठी थांबतात. पहाटे टोकन मिळते अन् दुपारी लस घेतली जाते असे चित्र आहे. गेल्या वीस दिवसांपासून सातारा तालुक्यातील एका वाचकाचा ‘तरुण भारत’ कार्यालयात फोन आला होता की जिल्हा रुग्णालयातल्या लसीकरण केंद्रामध्ये पैसे दिले की लस लगेच मिळते. मी लस घ्यायला चाललो आहे, असे फोनवरुन सांगितले. पुन्हा दोन दिवसानंतर लस घेतली असे त्या वाचकाने फोनवरुन सांगितले होते. ‘तरुण भारत’ने संबंधित यंत्रणेला असे प्रकार होत असल्याचे सांगितले होते. त्यादृष्टीने प्रशासन खातरजमा करत असताना गुरुवारी असला प्रकार होत असल्याचे समोर आले. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील खाजगी कर्मचाऱयास अचानक कामावरुन काढून टाकण्यात आले. तो कर्मचारी लसीकरणासाठी आलेल्यांकडून 500 रुपयांपासून मिळेल असे पैसे उकळत असल्याची तक्रार झाली होती. मात्र, त्या कर्मचाऱयास कामावरुन काढून टाकल्याने असा भ्रष्टाचार करणाऱयाची साखळी असण्याची शक्यता जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रामध्ये व्यक्त होत असून तशी चर्चा सुरु होती. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जावून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, डॉ. कारंजकर यांच्याशी संपर्क साधला असता तो कर्मचारी पैसे घेत असताना सापडला म्हणून काढले नाही तर तशी तक्रार सिव्हील सर्जन यांच्याकडे झाली होती. म्हणून त्यास कामावरुन काढले आहे, असे त्यांनी सांगितले.








