कोरोना प्रतिबंधक लसीसाठी रविवारीही गर्दी,लस संपल्याने निराशा
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सप्ताहभर कोरोना प्रतिबंधक लसीचा होणारा अनियमित पुरवठा पाहता त्याचा परिणाम लसीकरणावर झाला आहे. रविवारी सुटीदिवशी शहरासह जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीसाठी गर्दी झाली. भर उन्हात केंद्राबाहेर लांबलचक रांगाही लागल्या. पण डोसची मर्यादित संख्या असल्याने रांगेत उभे राहूनही अनेकांच्या पदरी निराशा आली. रांगेत मधूनच शिरणाऱ्यांवरून वादावादीचे प्रकार घडल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात शनिवारी उपलब्ध 26 हजार डोस दुपारीच संपले होते, सायंकाळी पुणे येथून 60 हजार डोस आले आहेत. त्याचे वितरण तातडीने लसीकरण केंद्रांवर करण्यात आले. रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून लसीसाठी अनेक केंद्रांवर गर्दी झाली होती. शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल, कसबा बावडा येथील सेवा रूग्णालय, सीपीआर हॉस्पिटलमध्ये सकाळपासूनच लससाठी रांगा लागल्या होत्या. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह अन्य नागरी आरोग्य केंद्रावर सरासरी 200 डोस देण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी झाली होती.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, सीपीआरमधील कोयना बिल्डींग, लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयातील नव्या इमारतीतील केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. यामध्ये वृद्ध, महिलांची संख्या अधिक होती. दुपारी एकच्या दरम्यान तर या रांगा वाढतच गेल्या. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील रांगेत अडीचशेहून अधिक लाभार्थी होते. त्यामुळे येथे वादावादी अन् गोंधळाचे प्रकार घडले. सीपीआरमधील केंद्रांवर शिस्तबद्धपणे लसीकरण सुरू हेते. पण येथेही दुसऱया मजल्यावरून पहिल्या मजल्यापर्यत जिन्यावर रांग लागली होती. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये 200 डोस असल्याने ते दिल्यानंतर रांगेतील इतरांना थांबूनही लस न मिळाल्याने त्यांची निराशा झाल्याचे दिसून आले.









