नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक असणाऱया कोरोना लसीवरही विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत, ही दुर्दैवाची बाब असल्याचा आरोप भाजपने केला आहे. विशेषतःकाँग्रेसने या संबंधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करून नुकसानच केले आहे, असे प्रतिपादन पक्षप्रवक्ते संबित पात्रा यांनी केले.
संपूर्णपणे भारतात निर्माण करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या परिणामकारकतेवर संशय व्यक्त करण्यात विरोधी पक्षांना धन्यता वाटत आहे. मात्र, आता ही लस 81 टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाल्याने विरोधकांचीच कोंडी झाली. भारतनिर्मिती वस्तूंसंदर्भात विरोधकांना आदर नाही. त्यांना विदेशांवर अवलंबून राहण्याची सवय लागली आहे. पंजाब, छत्तीसगड, केरळ, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांच्या सरकारांनी या लसीबद्दल शंका व्यक्त करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी ही लस का घेत नाहीत, असा प्रश्नही कुत्सितपणे विरोधी पक्ष विचारत होते. आता पंतप्रधान मोदींनी हीच लस घेतली असल्याने विरोधी पक्षांचा आवाजच बंद झाला असे प्रतिपादन त्यांनी केले.









