केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा दावा- चंदीगढ येथे माध्यमांशी संवाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना लसीमुळे आतापर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. सीएसआयआर-सीएसआयओ चंदीगढ येथे सेंटर फॉर एक्सलन्स फॉर इंटेलिजेंट सेन्सर अँड सिस्टिम्स येथे माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लसीकरणामुळे आतापर्यंत कुणाचा मृत्यू झालेला नाही. मात्र, लस घेतल्यानंतरही मृत्युमुखी पडलेल्या लोकांची वैद्यकीय माहिती तपासून तज्ञांच्या पथकाद्वारे राष्ट्रीय पातळीवर चौकशी केली जात असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.
भारतातील देशव्यापी लसीकरणाचा अहवाल खूपच चांगला आहे. देशात लसीकरण मोहीम राबविण्याबरोबरच भारताने अन्य 76 देशांना 6 कोटी डोस देखील दिले आहेत. त्यामुळे केवळ आपला भारतच नाही तर आपण संपूर्ण जगाला मदत करत आहोत. लस देण्याचे कामही जन आंदोलनासारखेच केले जात आहे. आता लसीबाबतची भीतीही कमी झाली आहे. आम्ही लोकांना लसीबाबत माहिती देण्यासाठी देखील एक मोहीम राबवत आहोत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
देशात साडेचार कोटी लसीकरणाचे लाभार्थी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 4 कोटी 50 लाख 65 हजार 998 पेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत, कोरोना लसीचा पहिला डोस भारतातील 77 लाख 86 हजार 205 आरोग्य सेवा आणि 80 लाख 95 हजार 711 प्रंटलाईन कर्मचाऱयांना देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 48 लाख 81 हजार 954 आरोग्य सेवा आणि 26 लाख 09 हजार 742 प्रंटलाईन कर्मचाऱयांनी दुसरा डोसही घेतला आहे. याव्यतिरिक्त 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 37 लाख 21 हजार 455 लाभार्थ्यांना आणि 60 वर्षांवरील 1 कोटी 79 लाख 70 हजार 931 लाभार्थ्यांना देखील पहिला डोस देण्यात आला आहे.









