हंगेरीतील पेस्ट्री शॉपमध्ये अनोखा उपक्रम, फायजरसाठी हिरवा, स्पुतनिक-5साठी नारिंगी पेस्ट्री
हंगेरेतील एका पेस्ट्री शॉपने कोविड-19 लसींच्या थीमवर पेस्ट्री सादर केली आहे. या पेस्ट्रींना विविध लसींच्या थीमवर तयार करण्यात आले आहे. येथील सुलयान फॅमिलीज पेटिसरीमध्ये त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. छोटय़ा ग्लासमध्ये ठेवून डेकोरेटिव्ह सीरिंजसह त्यांना सादर करण्यात आले आहे. पेस्ट्रींच्या जेलीचा रंग विविध कोविड लसींना दर्शवितो. सायट्रस यलो एस्ट्राझेनेका तर त्याहून गडद पिवळा रंग सिनोफार्म लसीसाठी तयार करण्यात आला आहे. याचप्रकारे फायजरसाठी हिरवा, स्पुतनिक-5साठी नारिंगी आणि मॉडर्नासाठी निळा रंग वापरण्यात आला आहे.
हंगेरीत लसीकरण वेगाने सुरू असताना सुलियान फॅमिलीने ही पेस्ट्री तयार केली आहे. येथे मिळणारी पेस्ट्री लोक स्वतःच्या पसंतीने खरेदी करू शकतात. त्यांना खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या नोंदणीकरणाची गरज नाही आणि त्यांचा साइड इफेक्टही नसल्याचे मजेशीर विधान सुलियान पेटिसरीचे मालक केटॅलीन बेंको यांनी केले आहे. अशाप्रकारची पेस्ट्री तयार करून लसीकरणाच्या विरोधात आपण कुठलीच मोहीम चालवत नाही आहोत तसेच कुणाच्या बाजूने देखील आम्ही नाही. आमच्या प्रयत्नांमधून महामारीदरम्यान लोकांच्या चेहऱयावर हास्य उमटविण्याची इच्छा असल्याचे बेंको म्हणाले.









