गेल्या आठवडय़ापासून कर्नाटकात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. बुधवारी संपूर्ण देशात सर्वाधिक जणांना कर्नाटकात लस देण्यात आली. गुरुवारी खातेवाटप जाहीर झाले आहे. अनेकांची खाती काढून घेऊन त्यांना दुसरी खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा असंतोषाचा भडका उडाला आहे.
गेल्या आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱयावर आले होते. शनिवार दि. 16 रोजी बेंगळूरला व दुसऱया दिवशी रविवार दि. 17 जानेवारी रोजी बेळगाव-बागलकोटच्या दौऱयावर आले होते. त्याआधी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. ज्यांचे मंत्रिपद हुकले त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे शिमगा सुरू केला होता. पुन्हा मुख्यमंत्री बदलाची ओरड सुरू झाली होती. थोडय़ा दिवसात काय होते बघा, अशा शब्दात काही असंतुष्ट नेते राजकीय डावपेच रचण्याच्या तयारीत होते. अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री येडियुराप्पा हे विकासाचे डबल इंजीन आहेत, अशा शब्दात त्यांच्या कामाचा गौरव करताना असंतुष्टांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला होता. त्यामुळे 2-3 दिवस टीकाटिप्पणी बंद पडली होती.
गुरुवारी खातेवाटप जाहीर झाले आहे. अनेकांची खाती काढून घेऊन त्यांना दुसरी खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा असंतोषाचा भडका उडाला आहे. काँग्रेस सत्तेवर असताना मूळ काँग्रेसजन आणि उपरे हा वाद रंगला होता. आता भाजपमध्येही याचीच पुनरावृत्ती झालेली पहायला मिळत आहे. अचानक झालेल्या खातेबदलामुळे काँग्रेस-निजदमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना धक्का बसला आहे. 17 पैकी 5 जणांना अद्याप मंत्रिपदही मिळालेले नाही. ज्यांना मिळाले आहे त्यांना हवे असलेले खाते मिळत नाही, अशी स्थिती आहे. खातेवाटपात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जात आहे. विजयेंद्र यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. खातेवाटपात आपला कसलाच हस्तक्षेप नाही. सध्या जो असंतोष आहे, तो वडील व्यवस्थित हाताळतील, असे सांगत सध्याचा असंतोष खूप वेळ राहणार नाही, हे सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. मकर संक्रमणानंतर काय घडते ते पहा, असे अनेक असंतुष्ट नेते जाहीरपणे सांगत होते. आता हायकमांडने येडियुराप्पा यांचे तोंड भरून कौतुक केल्यामुळे असंतुष्ट गुढी पाडव्याची डेडलाईन देत आहेत.
मकर संक्रमणाला मुख्यमंत्री या संकटातून बचावले असतील. गुढी पाडव्याला तरी नेतृत्वबदल होणारच, या विश्वासात असंतुष्ट नेते वावरत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्यावेळी ज्यांना कोणाला हायकमांडकडे तक्रार करायची आहे, ते करू शकतात, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी असंतुष्टांना धक्का दिला होता. वयाचा विचार करत हायकमांडलाही कर्नाटकात नेतृत्व बदल करायचा आहे, हे स्पष्ट असले तरी सध्या या प्रयत्नांना हात घातल्यास प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, ही अटकळ लक्षात घेऊन ‘ठंडा कर के खावो’ धोरण अवलंबिले जात आहे. आपल्या कर्नाटक दौऱयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षांतर्गत असंतोषावर स्पष्ट भूमिका घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ऊठसूठ तक्रारी घेऊन दिल्लीला येऊ नका, गावच्या तक्रारी गावात, जिल्हय़ाच्या तक्रारी जिल्हय़ात व राज्यपातळीवरील तक्रारी राज्यपातळीवरील नेतेमंडळींसमक्ष सोडवा, असा सल्ला देत असंतुष्टांसाठी आपली दारे तूर्तास बंद केली आहेत. त्यामुळे बंडोबा थंडोबा झाले असले तरी खातेवाटपानंतर पुन्हा असंतोषाचा भडका उडाला आहे.
आजवर जे मुख्यमंत्र्यांच्या अवती भवती घुटमळत होते, ते मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्यापासून तूर्त दूर झाले आहेत. होन्नाळीचे आमदार व माजी मंत्री रेणुकाचार्य हे मुख्यमंत्र्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. आज ना उद्या आपल्यालाही मंत्रिपद मिळणार, या आशेने ते आजवर तग धरून होते. विस्तारात त्यांना डावलण्यात आले. विधान परिषद सदस्य सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे रेणुकाचार्य पार भडकले आहेत. योगेश्वर हे घोटाळेबाज आहेत. त्यांनी अनेक घोटाळे केले आहेत, त्यांना मंत्रिपद कसे दिले गेले असा सवाल उपस्थित करीत कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही पुरावेही सादर केले आहेत. अमित शहा यांच्या सूचक इशाऱयानंतर उघडपणे आरोपांच्या फैरी झाडणे कमी झाले असले तरी असंतुष्टांच्या मनातील खदखद मात्र कायम आहे.
गेल्या आठवडय़ापासून कर्नाटकात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. बुधवारी संपूर्ण देशात सर्वाधिक जणांना कर्नाटकात लस देण्यात आली. एका दिवसात 34,583 जणांना लस देण्यात आली असून गेल्या 5-6 दिवसात सव्वा लाखाहून अधिक डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांनी लस घेतली आहे. लसीकरणानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याची चर्चा आहे. शिमोगा, बळ्ळारी येथे दोघा जणांचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र, कोरोना लसीमुळे हे मृत्यू झाले नसल्याचे शवचिकित्सा अहवालानंतर स्पष्ट झाले असले तरी लसींबद्दल समर्थन आणि विरोध अशा दोन्ही चर्चा सुरू असतानाच लसीकरणाला मात्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध काँग्रेसने बुधवारी बेंगळूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. काँग्रेसचे जणू हे शक्तीप्रदर्शनच होते. याबरोबरच आमदार रामलिंगा रेड्डी आणि धुवनारायण यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्याध्यक्षांची संख्या पाचवर पोहोचली आहे. यापूर्वी डी. के. शिवकुमार यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपविताना ईश्वर खंडे, सतीश जारकीहोळी, सलीम अहमद या तिघा जणांना कार्याध्यक्षपद देण्यात आले होते. आता आणखी दोघा जणांची कार्याध्यक्षांच्या यादीत भर पडली आहे. पुढील निवडणुकीत स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आतापासूनच तयारी केली आहे. भाजपच्या प्रभावासमोर स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेस नेतेही मैदानात उतरले आहेत. अस्तित्वासाठी काँग्रेस-निजदचा संघर्ष सुरू आहे. तर भाजपमध्ये मात्र असंतुष्टांचा वावर वाढला आहे.









