कालकोंडा – मडगाव येथील प्रकार, दोन्ही पक्षांकडून आरोप – प्रत्यारोप, समाजमाध्यमांवर तीव्र पडसाद
प्रतिनिधी / मडगाव
लसीचे सर्व डोस करदात्यांच्या पैशांवर खरेदी केले गेले आहेत. असे असताना राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर पक्षाचे कार्यकर्ते व नेते अशा लसीकरण मोहिमा सुरू असलेल्या केंद्रांवर जमा होऊन श्रेय घेण्याचे प्रयत्न करत असल्याबद्दल समाजमाध्यमांतून जोरदार टीका करण्यात येत आहे. कालकोंडा येथील दैवज्ञ सभागृहात गुरुवारी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडल्याने या चर्चेला तोंड फुटले आहे. सरकार लोकांनी फेडलेल्या करांतून लसी विकत घेत असताना त्याचे श्रेय राजकीय पक्ष का घेऊ पाहत आहेत, असा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
गुरुवारी कालकोंडा येथे टीका उत्सवाच्या अंतर्गत लसीकरण मोहीम सुरू होती. मडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षा व काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका दिपाली सावळ यांनी त्यास उपस्थिती लावली होती. लस घेण्यासाठी येणाऱयांना आणण्यासाठी आपण वाहनाचा वापर व चहा-नाश्त्याची सोय केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तेथे काही भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली व आमच्या कामात हस्तक्षेप केला, असा दावा त्यांनी केला आहे.
भाजपाच्या नवीन रायकर यांनी स्थानिक आमदार व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर टीका केली आहे. काही गुंड या ठिकाणी आणून लसीकरणाच्या ठिकाणी तैनात केलेली भाजपाचा फलक लावलेली रुग्णवाहिका हटविण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना लसीकरण केंद्राच्या आवारातून बाहेर पडण्यास सांगितले. रायकर यांनी एका डॉक्टराने विनंती केल्याने सदर रुग्णवाहिका उपलब्ध केल्याचा दावा केला आहे. उपनगराध्यक्षा सावळ यांनी कोणा पक्षाच्या रुग्णवाहिकेची गरज नसून ती हटवावी, आम्ही सरकारी रुग्णवाहिका मागवून घेतो, असे पोलिसांना सांगितले.
राजकीय नेत्यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न कशाला ?
काही पक्षांच्या नेत्यांनी व्हॉट्सऍपवर व अन्य समाजमाध्यमांत लसीकरणासंदर्भात आपली छायाचित्रे टाकून पोस्ट टाकण्याचे प्रकार सुरू केल्याने ते थांबले पाहिजेत, असे मत व्यक्त होऊ लागले आहे. आरोग्य खात्याने लोकांना माहिती देण्याबाबत बॅनर लावायला हवेत. करदात्यांच्या पैशांचा वापर करून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय नेते का करतात, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कालकोंडा येथील टीका उत्सव केंद्रावर आरोग्य खाते रुग्णवाहिका ठेवण्यात का अपयशी ठरले आणि डॉक्टर एखाद्या राजकीय पक्षाला रुग्णवाहिकेवर बॅनर लावून ती उपलब्ध ठेवण्यास कसे सांगू शकतात, असे प्रश्न समाजमाध्यमांवर चर्चिले जात आहेत. लसीकरण केंद्रावर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची कोणताही गरज नव्हती. कारण लसीकरण मोहिमेच्या सुरळीत कार्यवाहीत अडथळा आणण्याव्यतिरिक्त या कार्यकर्त्यांनी काही केले नसून फक्त एकमेकांवर आरोप करून चिखलफेक केल्याची टीका या पार्श्वभूमीवर होताना दिसून येत आहे.









